पुण्याहून (Pune) मुंबईला (Mumbai) येणाऱ्या एका व्यावसायिकाला कॉफीमध्ये गुंगीचे औषध देत त्याच्या अंगावरील सव्वापाच तोळे दागिने आणि पैसे घेऊन चोरटा पळून गेला, अशा घटना सतत घडतात. मात्र, यापेक्षाही भयंकर गोष्ट पहिल्यांदा मुंबईत घडली आहे. या घटनेमुळे माणुसकी कशी संपून गेली हेही विदारकपणे समोर आले. गुंगीत असणारा प्रवासी मुंबईला “शिवनेरीने पोहोचला तेव्हा शिवनेरी स्टँडवरील (Shivneri Stand) कर्मचाऱ्यांनी हा माणूस नशेत असावा, म्हणून त्याला रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ फुटपाथवर सोडून दिले. तब्बल १६ तास हा माणूस फुटपाथवर बेवारस अवस्थेत पडून राहिला. त्यांचे कपडे, राहणीमान बघून कोणालाही विचारपूस करावी वाटली नाही. त्यांचा शोध घेत असलेल्या नातेवाईकांनी त्यांना ओळखून रुग्णालयात नेले. त्यानंतर तब्बल ८० तासांनी ते गृहस्थ शुद्धीवर आले. (CRIME)
शैलेंद्र साठे हे पुण्यात पत्नी आणि मुलांसोबत राहतात. ते दुबईतून (Dubai) पुण्यात जून स्थायिक झाले आहेत. १४ जून सकाळी साडेदहा वाजता वाकड येथून त्यांनी मुंबईसाठी शिवनेरी बस (बस क्रमांक ६६१७) पकडली. प्रवासादरम्यान शेजारी बसलेल्या अनोळखी प्रवाशाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दुपारी दोनच्या सुमारास बस पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील खालापूर येथील फूड मॉलकडे थांबली. साठे बसमधून उतरले. आईस्क्रीम खाऊन पुन्हा बसमध्ये चढणार तोच सहप्रवासी कॉफी घेऊन त्यांच्या समोर आला. त्यांनी कोणतीही शंका न घेता सहप्रवाशाने आणलेली कॉफी घेतली आणि बसमध्ये बसले. त्यानंतर काही मिनिटांतच ते बेशुद्ध झाले. प्रवासादरम्यान सहप्रवाशाने हातात रुमाल ठेवून ५३ ग्रॅम दागिने, मोबाईल, महागडे घड्याळ आणि किमती ऐवज लुटला. विशेष म्हणजे बसमध्ये सीसीटीव्ही आणि अन्य प्रवासी असताना कोणाचेही त्याकडे लक्ष गेले नाही.
(हेही वाचा – Vidhansabha Monsoon Session : एक अकेला मोदी सब पे भारी! विधानभवनाबाहेर सत्ताधाऱ्यांकडून इंडि आघाडीविरोधात बॅनरबाजी )
कोणीही मदतीसाठी पुढाकार घेतला नाही…
बस दादरला पोहोचली. बसमध्ये बेशुद्ध पडलेल्या साठे यांना शिवनेरीच्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी बसमधून उतरवून थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या शेजारील फुटपाथवर ठेवून ते निघून गेले. साठे तब्बल १६ तास फुटपाथवर बेवारस पडून होते. टॅक्सी चालक, पादचारी त्यांना बघत होते. चौकशीही करत होते; मात्र कोणीही मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. पोलिसांनाही कळवले नाही.
…तर जीवावर बेतले असते
साठे यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय घाबरले. मित्र-नातेवाइकांकडे चौकशी सुरू झाली. मोबाइल लोकेशन चेंबूर परिसरात बंद झाल्यामुळे गोवंडी पोलीस ठाण्यातही चौकशी केली. अखेर, त्यांच्या पत्नीने दादर परिसरात राहणाऱ्या त्यांच्या माहेरच्या मंडळींना याबाबत कळवून शोध घेण्यास सांगितले.
डॉक्टरांनी सांगितले…
‘शिवनेरी’ने चेंबूर येथे उतरणार असल्याने काही जणांनी चेंबूर येथे धाव घेतली. एका मेहुण्याने दादर शिवनेरी बस थांब्याकडे चौकशी सुरू केली. अखेर, चौकशीदरम्यान एक जण रस्त्यावर पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी तिथे धाव घेतली तेव्हा साठे बेशुद्धावस्थेत पडलेले दिसून आले. त्यांना तत्काळ जवळच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. ते पूर्णपणे डिहायड्रेटेड झाले होते. त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी थोडा उशीर झाला असता तर त्यांच्या जीवावर बेतले असते, असे डॉक्टरांनी सांगितले
माझ्यासोबत घडले ते तुमच्यासोबत नको म्हणून…
शिवनेरी बस प्रवासादरम्यान असे काही घडेल, असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. घटनेचे सीसीटीव्ही पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो. मुंबईत बेवारस पडूनी होतो. कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही. खरे तर या दरम्यान माझ्यासोबत २ गुन्हे घडले. एक प्रवासादरम्यान हातचलाखीने केलेली चोरी आणि दुसरे म्हणजे शिवनेरीच्या कर्मचाऱ्यांनी मदतीऐवजी दिलेली वाईट वागणूक. आज माझ्यासोबत झाले ते तुमच्यासोबत होऊ नये म्हणून अशा प्रवासादरम्यान नागरिकांनी अधिक सतर्क होणे गरजेचे आहे.
…अन् तपासाला वेग
कुटुंबीयांनी माटुंगा पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांची भेट घेत सर्व घटनाक्रम सांगताच त्यांनी तत्काळ तपास पथके नेमली. आरोपी चेंबूर परिसरात उतरल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी बस, घटनास्थळ येथील सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे.
‘ते’ उठून जातील…
दुपारी दोनच्या सुमारास बस दादरमध्ये आली. संबंधित प्रवासी अर्धवट झोपलेल्या स्थितीत होते. त्यामुळे त्यांना उचलून समोरच्या फुटपाथवर ठेवले. ते अर्ध्या तासांत उठून जातील, असे तेथील सुरक्षा रक्षकांना वाटल्याने त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community