- प्रतिनिधी
शस्त्रासह घरात घुसलेल्या बुरखाधारी दरोडेखोराने १४ वर्षांच्या मुलीच्या गळ्यावर शस्त्र लावून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान दाखवत मातेने मुलीचे प्राण वाचवत बुरखाधारी दरोडेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना दक्षिण मुंबईतील भायखळा येथील एका इमारतीत घडली. भायखळा पोलिसांनी बुरखाधारी इसमाला अटक करून त्याच्याजवळ असलेले खेळण्यातले पिस्तुल जप्त करुन त्याच्याविरुद्ध दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime)
अटक करण्यात आलेला ३० वर्षीय दरोडेखोर हा त्याच इमारतीत राहणाऱ्या एका वृद्धेकडे केअरटेकर म्हणून काम करीत होता. त्याला पैशांची अत्यंत गरज असल्यामुळे त्याने पैसे मिळविण्यासाठी दरोड्याची योजना आखली होती, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. तोरीकुल दलाल (३०) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भायखळा पूर्व येथे असणाऱ्या एका उच्चभ्रू इमारतीच्या १० व्या मजल्यावर एका खोलीत बुरखाधारी इसम शिरला आणी त्याने घरात असलेल्या १४ वर्षीय मुलीच्या गळ्यावर पिस्तुल लावली. मुलीने आरडाओरड करताच स्वयंपाक घरात असलेली आई धावत बाहेर आली, बुरखाधारी इसमाने घरातील दागदागिने आणि मौल्यवान वस्तूंची मागणी केली. (Crime)
(हेही वाचा – २०२८ पर्यंत १० टन वजनाचा उपग्रह ISRO स्वयं क्षमतेने पाठवणार)
मुलीच्या गळ्याला लावलेले पिस्तुल बघून मुलीची आई घाबरली. परंतु तिने संयमाने घेत बुरखाधारी इसमाला दागिने देते, परंतु मुलीला काही करू नको असे बोलून त्याला दागिने या इमारतीत असणाऱ्या दुसऱ्या खोलीत ठेवले असल्याचे सांगितले. त्याला बोलण्यात गुंतवत त्याच्याजवळ गेली आणि काही क्षणातच तिने बुरखाधारी इसमाच्या हातातील पिस्तुल खेचून त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली. आणि मायलेकीने बुरखाधारी व्यक्तीला पकडून ठेवले व मदतीसाठी शेजाऱ्यांना हाक मारली. शेजाऱ्यांनी तात्काळ त्याच्या घराकडे धाव घेऊन बुरखाधारी इसमाला ताब्यात घेऊन त्याचा बुरखा काढला असता बुरखाधारी इसम हा त्याच इमारतीत राहणाऱ्या एका वृद्धेकडे केअरटेकर असल्याचे समोर आले. या घटनेची माहिती तात्काळ भायखळा पोलिसांना देण्यात आली. (Crime)
घटनास्थळी दाखल झालेल्या भायखळा पोलिसांनी संशयित दरोडेखोराला ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असलेली पिस्तुल तपासली असता ती खेळण्यातील पिस्तुल असल्याचे समोर आले. पोलिसांनी याप्रकरणी दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून या केअरटेकरला अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता त्याला पैशांची नितांत गरज होती, व त्याला खात्री होती, १० व्या मजल्यावर राहणाऱ्याच्या घरी दागदागिने पैसा अडका मोठ्या प्रमाणात आहे, आणि त्याने लुटीची योजना आखून कोणी ओळखू नये म्हणून बुरखा विकत घेऊन बुरखा परिधान करून इमारतीत आला व १० मजल्यावर राहणाऱ्याच्या घरात घुसला होता अशी माहिती समोर आली आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community