दोन विशिष्ट संकेतस्थळांच्या माध्यमातून नागरिकांची खाजगी माहिती विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष क्र. ६ च्या पथकाने दोन जणांना अटक केली असून या दोघांनी बँक रिकव्हरी एजंट तसेच इतर कंपन्यांना या संकेतस्थळाच्या माध्यमातून युजर आयडी आणि पासवर्ड विकल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
किती रुपयांत पुरवली माहिती
निखिल येलीगट्टी आणि राहुल येलीगट्टी या दोन भावांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. हे दोघे मुलुंड परिसरात राहत असून या दोघांचे कार्यालय चेंबूर परिसरात आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभाग कक्ष क्र. ६ चे प्रभारी पोलिस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांना गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘Tracenow.co.in’ आणि ‘Fonivotech.com’ या दोन संकेतस्थळां (अप्लिकेशन ) च्या माध्यमातून भारतीयांची खाजगी माहिती (आधारकार्डला लिंक असणारी) विकली जात आहे. निखिल येलीगट्टी हा या दोन संकेतस्थळांचा युजर आयडी आणि पासवर्ड २ हजार रुपये महिना, १२ हजार रुपये ६ महिने आणि वर्षाचे २४ हजार रुपये घेऊन बँक रिकव्हरी कंपन्या आणि इतर कंपन्यांना देत आहे.
अशी होते फसवणूक
दरम्यान प्रभारी पोलिस निरीक्षक साळुंखे यांनी ही बाब गुन्हे अन्वेषण विभाग (प्रकटीकरण १) पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांच्या लक्षात आणून दिली. पोलीस उपायुक्त उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ६ च्या पथकाने तपास सुरु करून या संकेतस्थळाचे युजर आयडी आणि पासवर्ड विकत घेण्यासाठी बोगस ग्राहक तयार करण्यात आले. मात्र निखिल हा ओळखीशिवाय युजर आयडी देत असल्यामुळे पोलिसांनी एका बँक रिकव्हरी एजंटच्या माध्यमातून निखिल यांच्याकडून युजर आयडी आणि पासवर्ड महिना २ प्रमाणे तयार करून घेतला. पोलिसांनी या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून या संकेतस्थळावर गेले असता त्यात त्यांना राज्याचे ऑप्शन आले, तपास पथकाने ‘महाराष्ट्र राज्य’ या ऑप्शनवर क्लिक करून पोलीस शिपाई आणि बोगस ग्राहकांचे मोबाईल क्रमांक टाकले असता या आधारकार्डला लिंक असणारी सर्व माहिती तसेच त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, गावाचा पत्ता, आधारकार्ड क्रमांक, पॅनकार्ड इत्यादी माहिती आणि सद्यस्थितीत वापरत असलेला मोबाईल क्रमांक आणि कुटुंबाची अचूक माहिती उपलब्ध झाली. वैयक्तिक आणि खाजगी माहिती कुठेही दिलेली नसताना या संकेतस्थळावर विशिष्ट ऍडमिन युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून ही माहिती बेकायदेशीररित्या विकली जात असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
याप्रकरणी गुन्हे शाखेने चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून निखिल येलीगट्टी आणि राहुल येलीगट्टी या दोघांना अटक करण्यात आली असून या दोघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा तसेच खाजगी माहिती चोरी करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून या टोळीने अनेक खाजगी कंपन्या तसेच बँक रिकव्हरी एजंट यांनाही भारतीयांची माहिती विकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या माहितीच्या आधारे भारतीयांची फसवणूक, गैरफायदा घेतला गेला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community