Data Leak : गोपनीय डेटा लिक करण्याची धमकी देऊन विमा कंपनीकडे ३ कोटींची मागणी

57

Data Leak: एका प्रख्यात विमा कंपनीला (Insurance company) गोपनीय डेटा लिक करण्याची धमकी देऊन बिटकॉइनमध्ये (Bitcoin) ३ कोटी रुपयांची मागणी ईमेल मार्फत करण्यात आली आहे. या प्रकरणी विमा कंपनीने एनएम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात (NM Joshi Marg Police Station) तक्रार दाखल केली, पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून सायबर तज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला आहे. (Data Leak)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोअर परळमधील पेनिन्सुला पार्क (Peninsula Park Parel) येथे असलेल्या कंपनीला एका आठवड्यापूर्वी एका अनोळखी ईमेल वरून धमकीचा मेल प्राप्त झाला. धमकीचा मेल पाठविणाऱ्याने ४.२ बिटकॉइनची (अंदाजे ३ कोटी) मागणी केली. खंडणी (Extortion) न दिल्यास कंपनीचा डेटा सोशल मीडियावर व्हायरल केला जाईल असा इशारा दिला. या धमकीमुळे घाबरलेल्या कंपनीने धमकीचा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली.

तसेच एनएम जोशी मार्ग पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (३) आणि ३५१ (२), आयटी कायद्याच्या कलम ६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या कायदेशीर विभागाने अंतर्गत चौकशी केली होती आणि संबंधित माहिती पोलिसांना दिली होती. तपासकर्ते आता ईमेलचे विश्लेषण करत आहेत आणि पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ञांशी मदत घेण्यात येत आहे. तसेच धमकीचा मेल पाठवणारी व्यक्ती कंपनीतील व्यक्ती असू शकते, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे, या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.