रेल्वे स्थानक आणि खाजगी आस्थापनाकडून लावण्यात आलेल्या क्लोज सर्किट कॅमेऱ्यामुळे (CCTV Camera) मुंबईतील गंभीर गुन्ह्याची उकल होत असून गृहविभागाकडून बसविण्यात आलेले कॅमेरे काही कामाचे नसल्याचे मत पोलीस अधिकाऱ्यांकडून वर्तवले जात आहे. मुंबईत गृहविभागाकडून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज अस्पष्ट असल्यामुळे गुन्ह्याची उकल करण्यासाठी खाजगी आस्थापना, खाजगी सोसायटी आणि रेल्वे स्थानकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराची मदत घ्यावी लागते, असे मत मुंबईतील अनेक पोलिसांकडून मांडण्यात येत आहे, याचे ताजे उदाहरण म्हणजे सलमान खानच्या निवासस्थानी झालेला गोळीबार, या गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हे शाखेला रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेराची मदत घ्यावी लागली होती.
मुंबई किती आहेत सीसीटीव्ही कॅमेरे?
मुंबई शहरासह उपनगरात सीसीटीव्ही कॅमेराचे (CCTV Camera) मोठे जाळे पसरले आहे. बँका, एटीएम, वित्तीय संस्था, दागिन्यांची दुकाने, हॉटेल्स, गेस्टहाउस, रेस्टॉरंट, बार आणि पब, कार्यालय आणि निवासी टॉवर, पेट्रोल पंप, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मॉल्स, क्रीडा मैदान, जिम, सिनेमा हॉल, शैक्षणिक संस्था आणि प्रार्थनास्थळे आणि सरकारी असे जवळपास ७० हजार सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) शहरभर लावण्यात आलेले आहेत. मुंबई शहरात खाजगी आस्थापनाचे ६० हजार सीसीटीव्ही कॅमेरे असून गृहविभागाचे १० हजार कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गृहमंत्रालयाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आणि देखरेखीचे कंत्राट एल अँड टी या खाजगी कंपनीला देण्यात आलेले आहे. शहरभर पसरलेल्या कॅमेराच्या जाळ्यामुळे रस्त्यावर होणारे गुन्ह्याचे प्रमाण कमी झाल्याचे पोलिसांचे मत असले तरी, शहरात होणारे गुन्हे शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या (CCTV Camera) फुटेजमुळे उकल होण्याचे प्रमाण देखील मोठे असल्याचे मत पोलिस अधिकारी व्यक्त करीत आहेत. मात्र सरकारी कॅमेराचा दर्जा खाजगी आस्थापनाच्या कॅमेरापेक्षा खराब असल्याचे अधिकारी मान्य करीत आहेत.
खासगी कॅमेरे उत्कृष्ट
मुंबईतील सरकारी कॅमेऱ्यांची दिशा आणि दृश्य क्षेत्र असे आहे की, काही क्षेत्र त्यात कैद होत नाही, कॅमेऱ्यांचा दर्जा निकृष्ट आहे आणि रेकॉर्डिंगचा दर्जा अपुरा आहे, त्यात गुन्ह्यांच्या घटनांची नोंद होत नाही, त्यामुळे अनेक वेळा गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी खाजगी आस्थापना आणि परिसरातील रेल्वे स्थानकातील कॅमेराची मदत घ्यावी लागते असे काही अधिकारी सांगतात. अनेक ठिकाणचे सरकारी कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे किंवा ते नादुरुस्त झाले असल्याचे लक्षात आल्यावर त्याची माहिती संबंधिताना देण्यात येते, त्यांची दुरुस्ती करण्यात देखील येते परंतु घटनेचे जसे फुटेज (चित्रण) पाहिजे तेवढे स्पष्ट फुटेज मिळून येत नसल्याची खंत अधिकारी व्यक्त करतात.
सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार, सीसीटीव्ही अस्पष्ट
मुंबईत नुकत्याच झालेल्या एका घटनेवरून सरकारी कॅमेराचा दर्जा आणि अस्पष्टता समोर आली आहे. रविवारी पहाटे ५ वाजता मुंबईतील वांद्रे येथे बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचे चित्रण सरकारी कॅमेरात कैद झाले. मात्र ते अस्पष्ट असल्यामुळे हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलचा क्रमांक आणि हल्लेखोर हे अस्पष्ट दिसत असल्यामुळे तपास यंत्रणेला खाजगी आस्थापना आणि रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांची (CCTV Camera) मदत घ्यावी लागली होती. तपास यंत्रणेला वांद्रे रेल्वे स्थानकातील कॅमेराच्या स्पष्ट फुटेजमुळे हल्लेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसत होते, तसेच हल्लेखोर कुठल्या दिशेने गेले याची देखील माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली होती. एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार शहरातील सरकारी सीसीटीव्ही कॅमेराचा दर्जा सुधारण्याची गरज आहे, या कॅमेरांची वेळोवेळी देखभाल करणे गरजेचे आहे. कॅमेरांचा दर्जा सुधारल्यावर गुन्ह्याची उकल करण्यास विलंब होणार नाही.
Join Our WhatsApp Community