विशेष पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर देवेन भारती यांचे सूचक ट्विट

‘मुंबई पोलीस एक टीम आहे, इथे कोणीही सिंघम नाही’ असे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती विशेष पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर स्वतःच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर महत्वाचे ट्विट केले. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली आहे. अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे हे पद असून या पदावर पहिले विशेष पोलीस आयुक्तपदी जेष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची नियुक्तीची घोषणा बुधवारी राज्याच्या गृह विभागाने केली. गुरुवारी सकाळी ११वाजता विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे मुंबई पोलीस मुख्यालयात दाखल झाले. सर्वात प्रथम भारती यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली.

( हेही वाचा : मुंबई-गोवा ‘शिवशाही’ कायस्वरुपी धावणार; किती असेल तिकीट?)

त्यानंतर भारती हे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुरक्षा) सत्यनारायण चौधरी यांच्या दालनाकडे आले व त्यांनी मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या चौधरी यांची भेट घेतली. त्याठिकाणी पाचही सह पोलीस आयुक्तांची चर्चा करून कामाचा आढावा घेतला. विशेष पोलीस आयुक्त यांच्या बसण्याची अद्याप व्यवस्था नसल्यामुळे भारती यांनी सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था यांच्या दालनातच विशेष पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला असून प्रसारमाध्यमांशी भारती यांनी बोलणे टाळले, असले तरी त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर ‘मुंबई पोलीस एक टीम आहे, इथे कोणीही सिंघम नाही’ असे महत्वाचे ट्विट केले.

मुंबईचे पोलीस आयुक्तांचे पूर्वी पहिल्या मजल्यावर दालन होते, त्याच मजल्यावर देवेन भारती तत्कालीन सह पोलीस आयुक्त (कायदा व सुरक्षा) असताना त्यांचे दालन होते. मात्र नुकतेच पोलीस आयुक्तांचे दालन त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बनविण्यात आले व वर्षभरापूर्वी नवीन दालनात पोलीस आयुक्त बसतात. विशेष पोलीस आयुक्त हे पद नव्याने निर्माण केल्यामुळे विशेष पोलीस आयुक्त यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था पहिल्या मजल्यावर ( पोलीस आयुक्त जुने दालन) करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जुन्या दालनाच्या डागडुजीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल व लवकरच विशेष पोलीस आयुक्त यांच्यासाठी नवीन दालन तयार होईल, तो पर्यत भारती हे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुरक्षा) यांच्या दालनातून आपल्या कामाची सुरुवात करणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here