आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असणारी धारावी गोळीबार आणि एका हिंदू तरुणांच्या हत्येने हादरली आहे. हिंदू तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून धारावी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले होते. या दोन्ही घटनांमुळे धारावीतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी धारावीतील राजीव गांधी नगर येथे काही मुस्लिम तरुणांनी २६ वर्षाच्या हिंदू तरुणाची भोसकून हत्या केली, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेला काही तास उलटत नाही तोच सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास धारावीतील मदिना कंपाउंड, साबून गल्ली या ठिकाणी एकाने लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी साबणाच्या कारखान्याच्या शटरवर गोळीबार केला. (Dharavi Crime)
या गोळीबार प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजा बिडकर यांनी दिली. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसून दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार करण्यात आला होता असे बिडकर यांनी सांगितले. धारावीतील राजीव गांधी नगर येथे राहणाऱ्या अरविंद वैश्य या तरुणाची रविवारी रात्री निशार शेख उर्फ अल्लू आणि आरिफ या दोघांनी तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली, क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून काही तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान या हत्येच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी धारावी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले, या घटनेत दोनपेक्षा अधिक आरोपी असताना पोलिसांनी केवळ दोनच जणांवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. (Dharavi Crime)
(हेही वाचा – Zika Virus: पुणेकर सावध व्हा! झिका व्हायरसची झपाट्याने वाढ; एकूण रुग्णांची संख्या ४८ वर)
दुसऱ्या घटनेत धारावीतील मदिना कंपाउंड, साबून गल्ली या ठिकाणी असलेल्या एका साबणाच्या कारखान्याच्या बंद शटरवर सोमवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराची माहिती मोहम्मद शहनवाज मोहम्मद अस्लम शेख (२७) याने पोलिसांना दिली होती. धारावी पोलिसांनी मोहम्मद शहनवाज यांच्याकडे कसून चौकशी केली असता हा गोळीबार त्यानेच केल्याचे समोर आले, लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्याने हा गोळीबार केल्याची कबुली पोलिसांना दिली. धारावी पोलिसांनी मोहम्मद शहनवाज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला गोळीबार प्रकरणात अटक करून त्याच्याजवळून देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत राऊंड जप्त केल्याची माहिती धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजा बिडकर यांनी दिली. मोहम्मद शहनवाज हा नशेबाज असून त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. (Dharavi Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community