चोर समजून जमावाने केलेल्या मारहाणीत २९ वर्षीय तरुणाचा मृत्यु (Died) झाल्याची खळबळजनक घटना बोरिवली पूर्व येथे गुरुवार २५ मे रोजी घडली. जमावाच्या मारहाणीत मृत झालेला तरुण हा मुंबई पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्याचा लहान भाऊ होता. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी ६ ते ७ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
प्रवीण लहाने (२९) असे या तरुणाचे नाव असून तो सांताक्रूझ पोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक असलेल्या पोलीस अधिकारी याचा लहान भाऊ होता.
(हेही वाचा – Drugs Supply : युरोपियन राष्ट्रात स्नॅक्सच्या पाकीटामधून ड्रग्स पुरवठा)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे दीडच्या सुमारास प्रवीण लहाने याने मद्यधुंद अवस्थेत एका इमारतीत प्रवेश केला होता, त्यानंतर लहाने हा भिंतीवर चढून बाहेर पडण्याच्या प्रयत्न करीत असताना इमारतीच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला हटकले, आणि त्याच्याकडे विचारपूस केली. त्यानंतर बोलताना प्रवीण लहाने अडखळू लागल्यामुळे सुरक्षा रक्षकाला तो चोर असल्याचा संशय आला, दरम्यान सोसायटीचे काही रहिवाशी इमारतीच्या आवारात गोळा झाले. त्यानंतर सुरक्षा रक्षक आणि काही रहिवाश्यांनी चोर समजून प्रवीण लहाने याला लाथा बुक्यांनी, काठीने मारहाण केली.
या घटनेची माहिती कस्तुरबा मार्ग पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित तरुणाची जमावाच्या तावडीतून सुटका करून त्याला वैद्यकीय तपासणी साठी शताब्दी रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्याला तिथून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र चौकशी सुरू असताना प्रवीण लहाने हा पोलिस ठाण्यात कोसळला, त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत (Died) घोषित केले.
हेही पहा –
पोलिसांकडून त्याचा मृतदेह (Died) शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ स्पष्ट होईल अशी माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे.
पोलीस उपायुक्त (परिमंडळ १२) स्मिता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपसावरून ६ ते ७ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सुरक्षा रक्षकासह चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मृत तरुणाचा भाऊ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश लहाने हे सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तैनात आहेत.
Join Our WhatsApp Community