डीआरआयचे ‘ऑपरेशन गोल्डन डॉन’ यशस्वी! ५१ कोटींच्या सोन्यासह १० जणांना अटक

115

परदेशातून भारतात सोन्याची तस्करी करणाऱ्या गोल्डन टोळीचा छडा लावण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआयआर) यश आले आहे. डीआयआरकडून राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन गोल्डन डॉन’ दरम्यान बिहार, मुंबई आणि पुणे या ठिकाणी केलेल्या कारवाईत १०१.७ किलो सोने (किंमत अंदाजे ५१कोटी) जप्त करण्यात आले आहेत, या प्रकरणी ७ सुदानी नागरिकांसह १० जणांना सोने तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

( हेही वाचा : पहिल्या इयत्तेत प्रवेशासाठी मुलांचे वय ‘6+’ असणे गरजेचे! शिक्षण मंत्रालयाचे निर्देश )

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी पाच जणांची ओळख पटविण्यात आली असून त्यात तीन भारतीय नागरिक आहेत. सैफ सय्यद खान, शमशेर खान आणि मनीष प्रकाश जैन अशी भारतीय नागरिकांचे नावे आहेत, तसेच मुसाब महमूद नोरी आणि मुसाब हसन एलहसान हे दोघे सुदान नागरिक आहेत. सलग ३ दिवस सुरू असलेल्या या कारवाई दरम्यान डीआरआयने कुलाबा आणि झवेरी बाजारमधील चार ठिकाणांसह अनेक ठिकाणी छापे टाकले आहे.

भारत-नेपाळ सीमा या मार्गाचा वापर करून नेपाळमधून बिहारमध्ये सोने आणल्यानंतर हे सोने रेल्वे किंवा हवाई मार्गाने मुंबईत आणले जात होते, अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्याने दिली. १९ फेब्रुवारी रोजी डीआरआयच्या अधिकार्‍यांनी तीन सुदानी नागरिकांना मुंबईच्या दिशेने येताना पाटणा रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढताना ताब्यात घेतले, झडतीत त्यांच्या जवळ असणाऱ्या ४० पॅकेट्स मध्ये ३७.१३ किलो वजनाची सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली. ही सोन्याची पेस्ट त्यांनी अंगात घातलेल्या स्लीव्हलेस जॅकेटच्या खास बनवलेल्या पोकळीत लपवून ठेवली होती अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांपैकी एक हँडलर होता, जो सीमावर्ती भागात आणि सोने वाहतूक करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे, क्रियालाप करणे असे कामे पहात होता.

या अनुषंगाने २० फेब्रुवारी रोजी, हैद्राबाद येथून मुंबईला बसने येणाऱ्या दोन सुदान नागरिक महिलांना पुण्यात ताब्यात घेण्यात आले, त्यांच्या सोबत असणाऱ्या बॅगेत ५.६१५ किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. दरम्यान पाटण्याहून मुंबईला आलेल्या महमूद आणि हसन यांना सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावर ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून ४८.७६ किलो वजनाची सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली आहे, त्यांनी या सोन्याचा पेस्टचा कमरपट्टा तयार करून कमरेला लावून आले होते, अशी माहिती डीआरआय अधिकाऱ्याने दिली.

ताब्यात घेण्यात आलेल्या सुदानी नागरिकांच्या चौकशीनंतर डीआरआय अधिकाऱ्यांनी कुलाबा आणि झवेरी बाजारातील चार ठिकाणी छापेमारी करून येथून सुमारे २०.२ किलो सोने आणि ७५ लाख रुपयांचे विदेशी चलन आणि ६३ लाख रुपयांचे भारतीय चलन जप्त करण्यात आले. या ठिकाणी सोन्याची पेस्ट गाळून त्यातून सोन एकत्र करून त्याचा साठा करण्यात येत होता अशी माहिती समोर आली. कुलाबा येथील दोन भाऊ – सैफ आणि शमशेर हे दोघे परदेशी लोकांकडून तस्करी केलेले सोने खरेदी करत होते आणि ते झवेरी बाजारातील सोन्याचे व्यापारी मनीष जैन याला विकत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.