नेपाळमधून मुंबई आणि ठाण्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी करण्यात येत असल्याची घटना उघडकीस आली. ठाणे गुन्हे शाखेने या प्रकरणी बिहार राज्यातील 2 जणांना ठाण्यातील कोपरी येथून 30 लाख रुपयांच्या अमली पदार्थासह अटक करण्यात आली आहे. या दोघांजवळून अमली पदार्थासह नेपाळी राष्ट्रातील चलनी नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्या असून नेपाळ येथून हे दोघे अमली पदार्थ घेऊन मुंबईकडे निघाले होते, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिली आहे.
प्रशांत कुमार रामबाबु सिंग (27) आणि प्रेमशंकर लक्ष्मीनारायण ठाकूर (23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही बिहार राज्यातील परसावणी, जि. सितामढी येथे राहणारे आहेत. नेपाळ येथून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ ठाण्यातील कोपरी परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा घटक 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त जयजित सिंग,पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे,अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वागळे युनिट 5 ठाण्याचे वरिष्ठ पो.निरीक्षक विकास घोडके, स.पो.निरी.भूषण शिंदे, स.पो.निरीक्षक अविनाश महाजन, पो.हवालदार अजय साबळे, रोहिदास रावते,सुनिल रावते,संदिप शिंदे,रघुनाथ गार्डे, पो.ना.तेजस ठाणेकर, म.पो.हवालदार.मिनाक्षी मोहिते आणि पो.शि. यश यादव, या पथकाने ठाण्यातील मंगला हायस्कूल कोपरी या शाळेजवळ सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या सामानाची झडती घेतली असता एकाच्या बॅगेत 2 किलो 60 ग्रॅम चरस आणि नेपाळचे चलन सापडले.
या दोघांजवळून पोलिसांनी अमली पदार्थ जप्त करून या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अनव्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 30 लाख रुपये एवढी किंमत आहे. अटक करण्यात 2 आरोपींची चौकशी केली असता दोघेही नेपाळमधून अमली पदार्थाची खरेदी करून लपतछपत भारतात आले. त्यानंतर दोघेही नेपाळहून आणलेल्या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी ठाणे आणि त्यानंतर मुंबईत येणार होते; मात्र त्याआधीच पोलिसांनी या दोघांना अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community