माजी शिक्षिका चालवत होती ड्रग्स तस्करीचे रॅकेट, दोन नायजेरियनसह सात जणांना अटक

176
Crime : कुर्ल्यातील मोहम्मद कलिम चौधरीला २ कोटींच्या ड्रग्जसह अटक

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ५८ वर्षीय माजी शिक्षिकेला तिच्या ३३ वर्षांच्या मुलासह सात जणांच्या टोळीला ड्रग्स तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन नायजेरियन नागरिकांचाही समावेश आहे. या टोळीकडून पोलिसांनी जवळपास १६ लाख रुपयांचे अंमली पदार्थ आणि डिजिटल वजनकाटा जप्त करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील केम्स कॉर्नर येथे राहणारी ५८ वर्षाची शिक्षिका ही संशयास्पदरित्या रात्रीच्या सुमारास खाजगी बसेस किंवा खाजगी टॅक्सीमधून पुण्याला येत जात असते अशी माहिती मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथक घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांनी पोलिसांचे पथक तयार करून तिच्या मागावर पाठवले. अंमली पदार्थ विरोधी पथकाने तिच्या संशयित हालचालींवर लक्ष ठेवले असता ही महिला ड्रग्स तस्करीचे (अंमली पदार्थ तस्करी) चे काम करीत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी वेळ न दडवता या महिलेला तिच्या ३३ वर्षांच्या मुलासह ताब्यात घेतले.

सुसेरिनो फर्नांडिस आणि तिचा ३३ वर्षीय मुलगा क्विंटन असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे असून दक्षिण मुंबईतील तिच्या राहत्या घराची झाडाझडतीत पोलिसांना मफेड्रोन आणि काही प्रमाणात कोकेन हे अंमली पदार्थ आढळून आले. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या दोघांना अटक करून त्याची कसून चौकशी केली असता माजी शिक्षिका असलेली सुसेरिनो फर्नांडिस ही अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालवत असून तिच्यासोबत या रॅकेटमध्ये एक नायजेरियन महिला असल्याची माहिती समोर आली आली. या प्रकरणात पोलीस पथकाने माहिम येथून अंजू विजय पाल आणि नायजेरियन नागरिक व्हिन्सेंट ओग्बोना एझिमा आणि तिच्यासोबत राहणारे हायसिंथ उझोल्ग्वे यांना अटक करण्यात आली. तर पुण्यात गेलेल्या पोलीस पथकाने पुण्यातून अनिकेत परदेशी आणि गौतम वाघेला यांना अटक केली. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दोघांना सुकोरीनीने अंमली पदार्थ पुरवल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या एका पथकाने सुखोरिनोच्या केम्प्स कॉर्नर येथील निवासस्थान आणि मालाड येथील मार्वे रोड तसेच विरार आणि पुणे इतर परिसरांची झडती घेतली आणि १६, लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ५८ ग्रॅम मेफेड्रोन आणि १५ ग्रॅम कोकेन जप्त केले.

(हेही वाचा – मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार; पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा)

पोलिसांच्या चौकशी दरम्यान सुसेरिनोने पोलिसांना सांगितले की, ती एक शिक्षिका होती, परंतु पतीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिने नोकरी सोडली. तीचा पती मासेमारी ट्रॉलर आणि सूचनाफलक भाड्याने देण्याचे काम करीत असे. २०१९ मध्ये तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, गोव्याहून लक्झरी बसमधून परतत असताना अंजु पालची भेट झाली, या भेटीत तीने तिच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. सुकेरिनो म्हणाली की पालने तिला “फेरींग क्रिस्टल्सचा व्यवसाय” करण्याची ऑफर केली. “सुरुवातीला सुखोरिनोला कळलेच नाही की ती सफ्टीकच्या नावाखाली ड्रग्सच्या धंद्यात आली आहे, नंतर तीला कळाले मात्र तिला पैशांची गरज असल्याने तिने ड्रग्सच्या धंद्यांत शिरकाव केला, पालकडून तीने एमडी आणि कोकेन विकत घेणे सुरू केले आणि ते पुणे आणि गोव्यातील ग्राहकांना पुरवत असे. पोलिसांनी पकडू नये किंवा पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून रात्री बस किंवा टॅक्सीमधून एकट्याने प्रवास करून अंमली पदार्थ ग्राहकापर्यंत पोहचवत होती अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. ही टोळी गेल्या दोन वर्षांपासून अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्व सातही आरोपींवर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना किल्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने सात ही जणांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.