‘डार्क नेट’ आणि ‘इन्स्टाग्राम’सारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून (Drug Trafficking) तस्करी चालते. ही तस्करी म्हणजे देशावरील हल्लाच असून एक मोठे रॅकेट यामागे काम करते. इथूनच ऑर्डर घेऊन थेट कुरियरने डिलिव्हरी होते. अशा प्रकारच्या तस्करीचा विषय मंगळवारी विधान परिषदेत गाजला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत धक्कादायक खुलासे केले.
कुरियरमधून अमली पदार्थांची डिलिव्हरी होत असल्याची प्रकरणे उघडकीस आल्यामुळे आता कुरियर कंपन्यांना विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीसांकडून तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान या मुद्द्यावर फडणवीस यांनी राज्य शासनाकडून सुरू असलेल्या कारवायांबाबत सखोल माहिती दिली.
महाराष्ट्रात पोलिसांना एखाद्या ड्रग्ज पेडलरला पकडल्यानंतर त्याच्या विविध लिंक शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच महाराष्ट्रात अमली पदार्थांच्या रॅकेटवर कारवाईचे प्रमाण वाढले आहे, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – Ind vs SA T20 : दुसरा टी-२० सामना जिंकून आफ्रिकन संघाची मालिकेत आघाडी )
डिटेंशन सेंटरमध्ये वाढ होणार…
मागील काही काळात राज्यात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १७४ जणांना पकडण्यात आले. अमली पदार्थ्यांच्या तस्करीत नायजेरियन नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. नायजेरियन तस्कर जाणूनबुजून अटक करून घेतात. त्यामुळे नायजेरियन कैद्यांसाठी डिटेंशन सेंटर ठेवण्यात येणार आहे. मुंबईत एक केंद्र उभारण्यात आले आहे. इतरही केंद्रे उभारण्यात येतील, असे फडणवीसांनी सांगितले.
हुक्का पार्लर्स बंद करण्याची मागणी
यावेळी हुक्का पार्लर्सच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करीचा मुद्दा अनिल परब यांनी उपस्थित केला. ही पार्लर्स अमली पदार्थांच्या डिलिव्हरीची केंद्रे बनली आहेत. ती बंद करण्याची मागणी त्यांनी केली. मुंबईत शाळा-महाविद्यालयांच्या जवळ असलेल्या पानटपऱ्या तोडण्यात आल्या. ३८,८७३ ई-सिगारेट्स जप्त करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.