भिंतीच्या पलीकडून तुरुंगात ड्रग्सचा पुरवठा; काय आहे नेमके प्रकरण?

112

भिंतीपलीकडून तुरुंगातील कैद्यांना अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याची खळबळजनक घटना आर्थर रोड तुरुंगात उघडकीस आली आहे. आर्थर रोड तुरुंग प्रशासनाला मंगळवारी पहाटे सर्कल नंबर ११ जवळ १३५ग्रॅम चरसचे पॅकेट मिळाले. याप्रकरणी एन.एम.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरुद्ध एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : महिलांना फसवून वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या धर्मांध मुसलमानांना अटक)

राज्यातील तुरुंगात लहान मोठ्या प्रमाणात गांजा हा अमली पदार्थ आढळून आल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. कच्च्या कैद्यांना न्यायालयातून तुरुंगात परत आणताना त्यांच्या तपासणीमध्ये अनेक वेळा अमली पदार्थ सापडले आहेत. तुरुंगातील कडक तपासणी दरम्यान पकडले जात असल्यामुळे सराईत गुन्हेगार असलेल्या कैद्यांनी, तुरुंगात अमली पदार्थ पोहचविण्यासाठी बाहेरील साथीदारांना कामाला लावले आहे. कैद्यांचे हे बाहेरील साथीदार कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुरुंगात असलेल्यांना कुठे, कधी, कसे ड्रग्स पाठवणार याची माहिती देतात आणि ठरल्याप्रमाणे तुरुंगाच्या बाहेरून भितींवरून पहाटे काळोखात अमली पदार्थाचे पाकीट फेकून निघून जातात अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मंगळवारी पहाटे असाच प्रकार उघडकीस आला आहे, कारागृह शिपायांच्या सतर्कतेमुळे आर्थर रोड तुरुंगाच्या सर्कल नंबर ११ जवळील भिंतीलगत प्लास्टिक पिशवीत बंद एक पाकीट मिळाले. हे पाकीट तपासले असता त्यात संशयास्पद पदार्थ असल्याचे कळताच शिपायाने ही बाब कारागृह अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.

अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर ते पाकीट चरस या अमली पदार्थाचे असल्याचे समोर आले. त्याचे वजन तब्बल १३५ ग्रॅम होते. याप्रकरणी एन.एम.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरुद्ध एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अमली पदार्थ कोणी व कुणासाठी टाकला याबाबत चौकशी सुरू असून कैद्यांच्या हालचालीवर कारागृह प्रशासन लक्ष ठेवून असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.