मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) गेल्या सात महिन्यांत शहरातून ४७९ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ (Drugs) जप्त केले असून ७९७ तस्करांना अटक करण्यात आली आहे, त्यात १० परदेशी नागरिकांचा समावेश आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मुंबईसह संपूर्ण उपनगरात करण्यात आली आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांमध्ये एमडी, हेरॉईन आणि गांजा, चरस इत्यादी अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी दिली.
देशभरात अंमली पदार्थाचा (Drugs) मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून तरुणांना नशेच्या आहारी लोटण्याचे काम समाज कंटकांकडून करण्यात येत आहे. मुंबई तसेच इतर महानगरातील पब, डिस्को तसेच पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये कार्यरत आहेत. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून मुंबईतील नशेचा बाजार करणाऱ्यांविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विविध युनिटने १ जानेवारी ते ३१ जुलै २०२४ या सात महिन्यांत मुंबईतील तसेच उपनगरातील विविध भागात छापे टाकून तसेच तस्करी करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Mukhyamantri Ladki Bahin Yojana: ऑगस्टच्या ‘या’ तारखेला महिला भगिनींच्या बँक खात्यात जमा होणार ३००० रुपये)
जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत आहे इतकी
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील सात महिन्यांत मुंबईतील विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईत ४७९ कोटींचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून एकूण ७९७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात १० परदेशी नागरिकांचा समावेश असून ९ नायजेरिया देशाचे नागरिक असून १ जण नेदरलँड देशाचा नागरिक असल्याची माहिती घुगे यांनी दिली. मुंबई तसेच उपनगरातून एकूण ८३४ किलो अंमली पदार्थ (Drugs) जप्त करण्यात आला असून त्यात चरस, गांजा, हेरॉईन, मफेड्रोन (एमडी), कोकेन आणि कफ सिरपचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ४७९ कोटी किंमत असल्याची माहिती श्याम घुगे यांनी दिली आहे, ही कारवाई केवळ सात महिन्यांत करण्यात आलेली असून पुढे ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे घुगे यांनी म्हटले आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या या कारवाईमुळे शहरातील ड्रग्स पेडलर्स आणि तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी धसका घेतला असून या टोळ्या मुंबई बाहेर पळून गेल्या आहेत. या कारवाई दरम्यान अंमली पदार्थ (Drugs) विरोधी पथकाने अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. एकट्या मुंबई शहरात २९३४ अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी २९३४ जणांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले की, मुंबईत एमडी आणि गांजा या अंमली पदार्थाची विक्री आणि सेवन मोठ्या प्रमाणात होत आहे, शाळा कॉलेज परिसरात आमच्या पथकांनी सापळे रचून किरकोळ ड्रग्स विक्रेत्यांना अटक करून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच मुंबईत नायजेरीयन टोळ्या खूप कमी झालेल्या असून स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विक्री केली जात असल्याचे कारवाईतून समोर आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community