“सब तयार है ना, मै १७ तारीख को आ रहा हु, युसूफ को मिल लिया? शक हो गया” एवढ्या संभाषणावर कॉल कट झाला, हा कॉल इस्कॉन मंदिराशी संबंधित व्यक्ती सर्वेश कुमार यांच्या मोबाईलवर आल्यामुळे दहशतवाद्याचा धमकीचा कॉल समजून पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी हा प्रकार गंभीरपणे घेऊन मंदिराची सुरक्षा वाढवुन तपासणी सुरू केली, तर कॉल तपासात असताना क्रॉस कनेक्शनमुळे हा कॉल सर्वेश कुमार यांच्या मोबाईलवर चुकून आल्याचे समोर आले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
( हेही वाचा : महाड MIDC मध्ये भीषण आग! ५ जण जखमी)
मुंबईत मागील काही महिन्यापासून निनावी कॉलवरून मुंबईला उडवून देण्याचे धमकीचे कॉल खाजगी संस्था, तसेच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला वारंवार प्राप्त होत आहे. मात्र प्रत्येक धमकीचे कॉल पोलिसांकडून गंभीरतेने घेतले जात असून त्या अनुषंगाने तपास केला जात आहे, तपासाअंती मात्र कॉल करणारे दारुडे, मनोरुग्ण असल्याचे समोर येते आणि पोलिसांची चांगलीच फजिती होत असल्याचे दिसून येते. या निनावी कॉलमुळे पोलीस यंत्रणा पुरती हैराण झालेली असताना पोलिसांना मंगळवारी एका क्रॉस कनेक्शनचा सामना करावा लागला.
८ तास उडाली तारांबळ
जुहूतील इस्कॉन मंदिराशी संबंधित असणारे सर्वेश कुमार यांच्या मोबाईल फोनवर एक निनावी कॉल आला होता, समोरून एक व्यक्ती “सब तयार है ना, मै १७ तारीख को आ रहा हु, युसूफ को मिल लिया? शक हो गया” त्यानंतर अचानक कॉल कट झाला, कॉल कोणी व का केला? याबाबत जाणून न घेता हा दहशतवाद्याचा धमकीचा कॉल असावा असे समुजन सर्वेश यांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवले. पोलिसांनी या कॉलला गंभीरपणे घेऊन तात्काळ मंदिराची सुरक्षा वाढवून तपासणी सुरू करण्यात आली, तर दुसरीकडे पोलिसांच्या एका पथकाने कॉल करणाऱ्या व्यक्तीची माहिती काढण्यास सुरुवात केली असता कॉल करणाऱ्या व्यक्तीला भोपळ येथे कॉल करायचा होता, मात्र क्रॉस कनेक्शन लागल्यामुळे हा कॉल सर्वेश कुमार यांच्या मोबाईल नंबरवर डायव्हर्ट झाला, सर्वेश यांनी संभाषण ऐकत असताना क्रॉस कनेक्शन लागल्याचे समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येताच त्यांनी कॉल कट केला अशी माहिती समोर आली. एका क्रॉस कनेक्शनमुळे मात्र मुंबई पोलिसांची ८ तास चांगलीच कसरत होऊन तारांबळ उडवून दिली होती.
Join Our WhatsApp Community