राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत्या विधानसभेत पक्षाचे चिन्ह कोणत्या गटाला मिळणार असा प्रश्न मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Election Commissioner of India Rajiv Kumar) यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या राजीव कुमार यांनी आढावा बैठकीनंतर दि. २८ सप्टेंबर रोजी पत्रकारांच्या प्रश्नांना विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर उत्तरे दिली.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले. त्यानंतर पक्षाचे नाव, चिन्ह यावरून दोन्ही गटात संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर गेला. त्यानंतर निवडणूक आयोगाने निकाल देत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) असल्याचे सांगितले. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्याचे निरीक्षण नोंदवले.
त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने अजित पवारांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह बहाल केले. ज्यामुळे शरद पवार गटाने सर्वेाच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाचा निकाल लोकसभेदरम्यान लागला नसल्याने शरद पवारांना तुतारी चिन्हांवर आणि ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ या नावावर निवडणूक लढवली.
अजित पवारांना (Ajit Pawar) कोणतं चिन्ह?
दरम्यान अजित पवारांना निवडणूक आयोगाकडून कोणते चिन्ह दिले जाणार असा प्रश्न मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार (Election Commissioner of India Rajiv Kumar) यांना एका पत्रकाराने दि. २८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत विचारला असता. कुमार म्हणाले की, अजित पवारांच्या गटाला विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोणते चिन्ह मिळणार हे सांगणे उचित ठरणार नाही. कारण चिन्हाच्या अधिकाराबाबतचा वाद सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे सर्वेाच्च न्यायालय याबाबत योग्य तो निर्णय घेईल. याविषयी मी कोणतेही भाष्य करणार नाही, असे ते म्हणाले.
अधिकाऱ्यांच्या बदल्याचं काय?
अधिकाऱ्यांच्या बदल्याविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, तीन वर्षाहून अधिक काळ एकाच ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी. त्याचबरोबर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने किंवा त्यांच्या कार्यकर्त्याने निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास सी- व्हिजिल अॅपवर नागरिकांना तक्रार करता येणार आहे.
दिव्यांगांच्या मदतीसाठी ‘सक्षम अॅप’ (Saksham App)
दरम्यान मतदान केंद्रावर दिव्यांगासह इतरांना मदत करण्यासाठी हेल्प डेस्क असणार आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लांब लाईनत उभ्या असणाऱ्यांसाठी ठिकठिकाणी दिशादर्शक आणि काही अंतरावर बेंच, खुर्ची यांचा व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याने गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात हेलिकॉप्टरच्या साहय्याने आम्ही मतदानासाठी जाणार आहोत. दिव्यांगांच्या मदतीसाठी ‘सक्षम अॅप’ (Saksham App), प्रत्येक मतदान केंद्रावर C17 ची त्वरीत प्रत मिळवण्याची सुविधा, राजकीय पक्षांना मैदान, पार्किंगची जागा, मतदान केंद्रावरील मंडपासाठी जागा या सर्व सुविधा पुरवण्यासाठी केल्या जाणाऱ्या नोंदणी प्रक्रियेच्या सुलभतेसाठी ‘सुविधा अॅपलिक्शन’च्या (Suvidha Candidate App) साहय्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ आयोगाकडून दिले जाणार आहे.