“मुंबई येथे दुबईवरुन पहाटे तीन नागरिक आले आहेत, ते अतिरेकी असून त्यांचा पाकिस्तानशी संबंध आहे, त्यातील एका व्यक्तीचे नाव मुजिब मुस्तफा सय्यद आहे,” या आशयाचा एक कॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आल्यानंतर मुंबईसह राज्यातील सुरक्षा यंत्रणा कामाला लागली होती.
परंतु कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता, या व्यक्तीने आपल्या चुलत भावाला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी अतिरेकी म्हणून आपल्या भावाचे नाव व मोबाईल क्रमांक दिला असे तपासात समोर आले. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अहमदनगर जिल्ह्यातून यासिन याकुब सय्यदला ताब्यात घेतले असून त्याला आझाद मैदान पोलिसांच्या स्वाधीन केले. आझाद मैदान पोलिसांनी कॉल करून अफवा पसरविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून यासिनला अटक केली आहे.
यासिन सय्यद आणि त्याचा चुलत भाऊ मुजिब मुस्तफा सय्यद हे कुटुंबासह अहमदनगर जिल्ह्यात राहण्यास आहे. अहमदनगर शहरातील भवानी नगर परिसरात या दोन्ही कुटुंबाचा वडिलोपार्जित साडे पाच गुंठ्याचा सामाईक प्लॉट आहे. या जागेवरून दोन्ही कुटुंबात वाद सुरू आहे. चुलत भावाला आणि त्याच्या कुटुंबियांना पोलीस चौकशीच्या फेऱ्यात अडकवून त्रास देण्यासाठी याकूब सय्यद याने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्ष येथे ७ एप्रिल रोजी कॉल केला. कॉल करून यासिनने पोलिसांना सांगितले की, मुंबईत दुबईहून तीन अतिरेकी आले असून त्यापैकी एका अतिरेकेचे नाव आपल्या चुलत भावाचे सांगितले तसेच मोबाईल क्रमांक आणि भाऊ वापरत असलेल्या वाहनाचा क्रमांक सुद्धा दिला होता, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांना दिली आहे.
Join Our WhatsApp Community