हॉटेलची तपासणी करण्यासाठी आलेल्या एका तोतया सीबीआय अधिकाऱ्याला हॉटेल ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. दीपक चंद्रसेन मोरे असे अटक करण्यात आलेल्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याचे नाव आहे. मानखुर्द लल्लूभाई कंपाउंड येथे राहणारा दीपक मोरे हा घाटकोपर पश्चिम येथील ‘न्यूओ लॉज’ या ठिकाणी मंगळवारी गेला होता. त्या ठिकाणी त्याने प्रथम जोडप्यासाठी रूम बुक करायचा आहे, असे विचारले. परंतु लॉज व्यवस्थापकाने या ठिकाणी जोडप्याला खोली देण्यात येत नाही असे सांगितले.
दीपक याने तुमच्या मालकासोबत बोलायचे असल्याचे सांगून लॉज मालकाचा मोबाईल क्रमांक मागितला. मात्र व्यवस्थापकाने नंबर देण्यास नकार दिला असता, दीपक याने स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून लॉजचे कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली, त्यानंतर दीपक मोरे याने लॉज मध्ये थांबलेल्या गेस्टच्या सामानाची तपासणी सुरू केली असता एका गेस्टला संशय आला. त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला.
तोतया सीबीआय अधिकाऱ्याला पोलिसांकडून अटक
घाटकोपर पोलिसांनी लॉज येथे धाव घेऊन स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या दीपक याच्याकडे ओळखपत्र विचारले असता तो ओळखपत्र दाखवू शकला नाही. पोलीस त्याला घेऊन पोलीस ठाण्यात आले व त्याच्याकडे चौकशी केली असता तो तोतया अधिकारी असल्याचे समोर आले. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.