मुंबईत ८० लाखांच्या बोगस नोटा जप्त

121

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ८० लाख रुपयांच्या बनावट नोटांसह पवई गार्डन येथून एकाला अटक केली आहे. सौजन्य भूषण पाटील (३१) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सौजन्य पाटील हा मूळचा पालघर जिल्ह्यात राहणारा असून तो एकाला बनावट नोटांचे पार्सल देण्यासाठी पवई येथे आला होता अशी माहिती पोलिसानी दिली आहे.

( हेही वाचा : पुण्यात घडला धक्कादायक; बाऊंसर्सनी विद्यार्थ्यांना उठाबशा काढायला लावल्या)

एक इसम पवई तलाव या ठिकाणी पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे पार्सल घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष १०च्या पथकाला मिळाली होती. मंगळवारी दुपारी कक्ष १०च्या पथकाने पवई येथील साकीविहार रोड, या ठिकाणी साध्या वेशात सापळा रचला असता एक इसम हा पवई येथील साकीविहार रोड वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी मोटारसायकल वरून आला व त्याची हालचाल संशयास्पद आढळून आल्यामुळे पोलीस पथकाने त्याच्याकडे जाऊन चौकशी केली, तो प्रथम पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या बॅगेची झडती घेण्यासाठी त्याच्याकडे बॅग मागितली असता त्याने पोलिसांना नकार दिला. पोलिसांना त्याच्यावरील संशय बळावला असता त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील बॅग तपासली असता बॅगेत ५००रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले. या नोटा तपासल्या असता त्या नोटा बनावट असल्याचे समोर आले. गुन्हे शाखेने त्याला नोटांसह ताब्यात घेऊन कक्ष कार्यालयात आणून चौकशी केली असता त्याचे नाव सौजन्य पाटील असे असून तो पालघर जिल्ह्यातील उमरोली येथे राहणारा असल्याचे सांगितले. पोलिसांनी नोटा मोजल्या असता ८० लाख रुपयांची बनावट नोटा असल्याचे समोर आले. नोटाचे पार्सल घेऊन एका व्यक्तीला देण्यासाठी आला असल्याची माहिती सौजन्य पाटीलने पोलिसांना दिली. जप्त करण्यात आलेल्या नोटा या कलर झेरॉक्स नोटा असून त्या असली म्हणून बाजारात वितरित करण्यात येणार होत्या अशी माहिती समोर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.