पूर्व उपनगरात सोनसाखळी चोऱ्या करून धुडगूस घालणाऱ्या पिता पुत्राला नेहरू नगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या पिता पुत्राने नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा केला होता. या प्रकरणाचा शोध घेण्यात येत असताना हे दोघे पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सोनसाखळी चोरी करून पळून जात असताना अटक करण्यात आली. (Mumbai Crime)
मोहम्मद अफजल कुरेशी (४२) आणि त्याचा १६ वर्षाचा मुलगा असे पिता पुत्र असून दोघेही दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात राहण्यास आहे. मोहम्मद अफजल हा सराईत सोनसाखळी चोर असून त्याने मुलाला सोनसाखळी चोरीचे धडे देण्यास सुरुवात केली होती. या दोघा पिता पुत्राने पूर्व उपनगरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी चोऱ्या करून धुडगूस घातला होता. (Mumbai Crime)
गेल्या आठवड्यात या पिता पुत्राने कुर्ला पूर्व नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाडा कॉलनी येथे काळ्या रंगाच्या स्कुटी वरून येऊन एका ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला होता. याप्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ सौदागर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भूषण मोरे, पोलीस अंमलदार निखिल वाघमोडे, स्वप्नील वानखेडे, सुनील भोसले, दिलीप गव्हाळे आणि अजित कावळे या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या दोघांचा शोध सुरू केला. (Mumbai Crime)
बुधवारी हे दोघे वाशीच्या दिशेने पळून जात असताना वानखेडे आणि वाघमोडे यांनी दोघांचा पाठलाग करून त्यांना मानखुर्द येथे ताब्यात घेतले. हे दोघे नुकतीच पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सोनसाखळी चोरी करून पळून जात होते. या दोघांना अटक करण्यात आली असून दोघांच्या झडतीत चोरीची सोनसाखळी मिळून आली. या पितापुत्रावर पूर्व उपनगरात सोनसाखळी चोरीचे ८ ते ९ गुन्हे दाखल आहेत. मोहम्मद अफजल कुरेशी हा सराईत सोनसाखळी चोर असून मुलाला शहरातील मोठा सोनसाखळी चोर बनवायचे होते, म्हणून वयाच्या १५ व्या वर्षी त्याने मुलाला सोनसाखळी चोरीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (Mumbai Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community