मुलीने जावयासोबत Honeymoon साठी काश्मीरला न जाता त्यांनी सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना येथे इस्लामिक पवित्र तीर्थयात्रा करावी यावरून जावई आणि सासऱ्यामध्ये झालेल्या वादातून सासऱ्याने जावयावर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम येथे घडली. या ॲसिड हल्ल्यात जावई जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कल्याण पश्चिमेकडील एपेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
ईबाद फलके (२९) असे ॲसिड हल्लयात जखमी झालेला जावयाचे नाव आहे. ईबाद याचा कल्याण पश्चिम येथे राहणाऱ्या झाकी खोतल (६५)याच्या मुलीसोबत नुकताच विवाह झाला होता, हे दाम्पत्य Honeymoon ला कुठे जायचे याची योजना आखत होते, दरम्यान ईबाद याने काश्मीर येथे मधुचंद्राला जाण्याचे ठरले, परंतु सासरे झाकी यांनी त्यांना मधुचंद्राला काश्मीर येथे जाण्यासाठी विरोध करून तुम्ही तीर्थयात्रेसाठी सौदी येथे मक्का मदिना येथे जा असा आग्रह केला. परंतू जावई ईबाद हा काश्मीर येथे Honeymoon साठी जाण्यासाठी ठाम होता, यावरून जावई आणि सासऱ्यात चांगलीच जुंपली, दरम्यान सासरे झाकी खोतल याने जावयाला लग्न मोडण्याची धमकी दिली होती, मागील अनेक दिवस हा वाद सुरू होता, बुधवारी पुन्हा हा वाद उफाळून आला, सायंकाळी ईबाद हा मोटारसायकलवरून घरातून रागाने निघाला, सासरा झाकी हा त्याच्या पाठोपाठ निघाला आणि आग्रा रोड येथील आशा टॉवर्सकडे जावयाला गाठून त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन सोबत आणलेले ज्वालाग्राही द्रव्य (ऍसिड) ईबाद वर फेकून तेथून पळ काढला.
ईबाद हा त्वचा जळाल्याने वेदनेने किंचाळत असताना आजूबाजूच्या रहिवाशांनी त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली, त्यांनी त्याला कल्याण पश्चिमेकडील एपेक्स रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन ईबादचा जबाब नोंदवून सासरा झाकी खोतल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता , २०२३ कलम १२४ (१) (स्वेच्छेने ॲसिडचा वापर करून गंभीर दुखापत करणे), ३५१ (३) (गुन्हेगारी धमकीसह जीवे मारण्याची धमकी) आणि ३५२ (शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणूनबुजून अपमान) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या सासर्याचा शोध घेण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community