दारू पिण्यास मनाई केल्यामुळे संतापलेल्या ‘रेन फॉरेस्ट फिल्म क्रू प्रोडक्शन’ कंपनीच्या मालकाने दोन वन मजुरांना मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे घडली. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
( हेही वाचा : G20 देशांच्या प्रतिनिधींची पुण्यात ऐतिहासिक स्थळांना भेट )
गणेश ठाकूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ‘रेन फॉरेस्ट फिल्म क्रू प्रोडक्शन’ कंपनीच्या मालकाचे नाव आहे. मंगेश पवार आणि कल्पेश ठालकर असे मारहाणीत जखमी झालेल्या वन मजुरांची नावे आहेत. गणेश ठाकूर हा दहिसर येथे राहण्यास आहे, गणेश ठाकूर यांची ‘रेन फॉरेस्ट फिल्म क्रू प्रोडक्शन’ कंपनी असल्यामुळे त्यांचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी चित्रपट, मालिकांचे चित्रीकरणाचे काम नेहमी सुरु असल्यामुळे येथील वन रक्षक आणि वन मजूर हे त्यांना चांगले ओळखीचे आहे. मागील काही दिवसांपूर्वी गणेश ठाकूर हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दारु पीत बसलेले असताना गस्तीवर असलेले वन मजूर कल्पेश ठाकूर यांनी त्यांना हटकले होते, व वनरक्षक आणि वनमजुरांनी या बाबत त्यांना वेळोवेळी समज दिली होती. याचा राग मनात ठेवून गणेश ठाकूर याने कल्पेश याला धमकी दिली होती, सोमवारी दुपारी कल्पेश आणि मंगेश पवार हे दोघे मोटारसायकलवरून गस्त करत असताना राष्ट्रीय उद्यानातील चिंचपाडा मैदान या ठिकाणी आले असता त्या ठिकाणी गणेश ठाकूर आणि चिराग हे दोघे बसलेले होते, त्यावेळी गणेश ठाकूर हा कल्पेशकडे रागाने बघत असल्यामुळे कल्पेशने त्याला रागाने काय बघतो असे विचारले असता गणेश ठाकूर हा कल्पेशच्या अंगावर धावून आला, यावेळी मंगेश पवार हा मध्यस्थी करायला पुढे आला असता गणेश ठाकुर याने मंगेश पवार आणि कल्पेश या दोघांना मारहाण केली.
या मारहाणीत मंगेश पवार याच्या उजव्या हाताची करंगळीला गंभीर इजा झाली, कल्पेशने मंगेश याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली येथे उपचारासाठी घेऊन आले, रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गणेश ठाकूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली असता त्याला जामिनावर सोडण्यात आले.