राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा खाजगी सचिव असल्याचे सांगून सुरतच्या एका इंजिनियरची फसवणूक करणाऱ्या दोन जणांविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या इंजिनियरने वाहतूक पोलिसांसाठी तयार केलेले मोबाईल अप्लिकेशनच्या कंत्राटाला राज्यात परवानगी मिळवण्यासाठी मार्च २०२२मध्ये राज्याच्या गृहखात्याकडे अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीच्या काळात राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री होते.
तक्रारदार मयूर खिमजीभाई वनेर (३८) हे गुजरात राज्यातील सुरत येथे राहणारे आहेत. गुजरात कच्छ येथील अदानी विमानतळावर इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून त्यांनी महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांचा वेळ आणि कागद वाचवण्यासाठी राज्यातील वाहतूक पोलिसांसाठी ‘ट्रॅफिक पोलीस मोबाईल अप्लिकेशन फॉर महाराष्ट्र’ हे मोबाईल अप्लिकेशन तयार केले होते. राज्यात या अप्लिकेशनला मान्यता मिळून त्याचे कंत्राट मयूर वनेर यांना मिळावे यासाठी ते प्रयत्नात होते. दरम्यान राष्ट्रवादीच्या एका पदाधिका-याच्या मार्फत मयूर वनेर या इंजिनियरने प्रशांत नवघरे यांची मंत्रालयाबाहेर भेट घेतली, नवघरे याने त्याची ओळख तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खाजगी सचिव अशी ओळख करून दिली आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत असलेला फोटो वनेर यांना दाखवला. इंजिनियर वनेर यांचे काम करून देण्याचे आश्वासन नवघरे यांनी दिले व त्यासाठी ६ लाख रुपये खर्च येईल असे सांगून सायबर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून नितेश सावदेकर यांची भेट घालून दिली. या दोघांनी मिळून वनेर यांच्याकडून दोन लाख ३८ हजार रुपये घेऊन त्यांचे काम न करता त्यांची फसवणूक केली.
वनेर यांनी प्रशांत यांच्याकडे दिलेल्या पैशाची मागणी केली असता” मंत्रालयात पैसे सर्वांना वाटले आहे, त्यांनी परत दिले तर तुमचे पैसे देऊ,असे सांगून वनेर यांचे पैसे परत देण्यास नकार दिला. या प्रकरणी इंजिनियर मयूर वनेर यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मरीन ड्राईव्ह पोलिसानी कथित खाजगी सचिव प्रशांत नवघरे आणि नितेश सावदेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
(हेही वाचा Chandrayaan 3 : चंद्रावर भारत पोहचला, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातही जल्लोष)
Join Our WhatsApp Community