अल्पवयीन मुलांना नशेची लत लावून त्यांना नशेच्या अवैध धंद्यात ओढणारे मोठे रॅकेट पूर्व उपनगरातील गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द या परिसरात कार्यरत आहे. ड्रग्जच्या अवैध व्यापारातून शिवाजी नगर येथे एका १७ वर्षांच्या मुलावर तलवारीने वार करून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. शिवाजी नगर पोलिसांनी या प्रकरणी ३ अल्पवयीन मुलांसह एका दाम्पत्याला अटक केली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे दाम्पत्य शिवाजी नगर मध्ये ड्रग्जचा अवैध धंदा करीत असून त्यांच्या सांगण्यावरून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण असून अंमली पदार्थांच्या (Drugs) तस्करीला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या हत्येमागे ड्रग्ज तस्करांचे संघटित रॅकेट असल्याचा आरोप करून गोवंडीवासीयांनी अंमली पदार्थमुक्त गोवंडीची मागणी करून एक उपक्रम सुरू केला आहे.
गोवंडीत राहणाऱ्या अहमद पठाण (१७) या अल्पवयीन मुलावर गेल्या आठवड्यात तलवारीने वार करून त्याची हत्या केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. वर्दळीच्या रस्त्यावर पठाण यांच्यावर अल्पवयीन मुलांसह तिघांनी हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ १३ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर समोर आला होता, या व्हिडीओमध्ये एक आरोपी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेल्या अल्पवयीन मुलावर तलवारीने हल्ला करताना दिसत होता. या हल्ल्यात अहमद पठाणचा मृत्यू झाला त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यात सहभागी तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आणि नंतर हफिजुल्ला खान आणि त्याच्या पत्नीला या प्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आली.
(हेही वाचा – New Delhi: एसीचे आउटडोर यूनिट डोक्यावर पडल्याने तरुण जागीच ठार, व्हिडीओ व्हायरल)
हफिजुल्ला खान हा अंमली पदार्थांचा (Drugs) पुरवठा करणाऱ्या रॅकेटमध्ये सामील होता, तसेच त्याने या बेकायदेशीर कृत्यांमध्ये अल्पवयीन मुलांना सहभागी करून घेतल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. एका स्थानिक माजी नगरसेवकानेही खान यांचे घर ड्रग्ज विक्री करण्याचे ठिकाण असल्याचा आरोप केला आहे. शिवाजी नगर मध्ये झालेल्या अल्पवयीन मुलाच्या हत्येमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे. गोवंडी सिटिझन वेलफेअर फोरमने या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
पूर्व उपनगरातील गोवंडी, शिवाजी नगर, देवनार, मानखुर्द या विभागामध्ये अंमली पदार्थ (ड्रग्ज) ची मोठी समस्या असून ड्रग्ज तस्करांनी गोवंडीला ड्रग्जचे केंद्र बनवले आहे आणि या व्यवसायात अल्पवयीन मुलांना नशेची लत लावून या अवैध धंद्यात सहभाग करून घेतले जात असल्याचा आरोप गोवंडी सिटिझन वेलफेअर फोरमचे संयोजक शेख फैयाज अलान यांनी केला आहे. या परिसरात कोडीन कफ सिरप पासून व्हाईटनर, बटन (झोपेच्या गोळ्या), गांजा, चरस, अफीम, एमडी इत्यादी अंमली पदार्थांची (Drugs) मोठ्या प्रमाणात विक्री आणि पुरवठा सुरू आहे, येथील १० ते १२ वर्षांपुढील मुले नशेच्या आहारी जात आहेत. कोडेन, व्हाईटनर आणि बटन या स्वस्त नशा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केल्या जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. येथील ड्रग्ज तस्करांविरुद्ध कोणी आवाज उठवला की, त्यांची अहमद पठाण सारखी हत्या केली जाते, हत्या किंवा हल्ला करण्यासाठी या टोळ्या अल्पवयीन मुलांचा वापर करतात असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा – माजी पोलीस आयुक्त Sanjay Pandey निवडणुकीच्या मैदानात, थेट केली उमेदवारांची घोषणा)
अनेक काळापासून गोवंडीमध्ये अंमली पदार्थ (Drugs) नियंत्रण विभाग आणि मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने या अवैध धंद्यांवर छापा टाकलेला नाही. पोलिस अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना अटक करतात आणि विक्रेत्यावर कोणतीही कारवाई न करता तेथून निघून जातात, असा आरोप करून अंमली पदार्थ तस्करांना दयामाया दाखवू नये अशी मागणी गोवंडी सिटिझन वेलफेअर फोरमचे संयोजक शेख फैयाज अलान यांनी केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community