मुंबई –
वांद्रे हिल रोड येथील प्रसिद्ध ‘पापा पंचो दा ढाबा’ या ठिकाणी जेवणात उंदीर आढळून आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाने मुंबईतील बडे रेस्टोरंट आणि हॉटेल मधील खाद्य पदार्थ आणि तेथील किचन मधील स्वच्छतेची तपासणी सुरू केली आहे.
मागील १२ दिवसात एफडीएने (अन्न व औषध प्रशासन विभाग) ६८ हॉटेलची (Hotels Inspection) कसून तपासणी केली आहे. दरम्यान कुलाब्यातील लोकप्रिय हॉटेल बडेमियासह माहीम येथील दिल्ली दरबार, गोवंडी येथील ‘क्लाउड किचन आउटलेट हायपर किचेन फूडटेक प्रायव्हेट लिमिटेड ‘या इतर दोन रेस्टॉरंटना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वांद्रे येथील पापा पंचो दा ढाब्यावर मागील महिन्यात एका ग्राहकाला जेवणात शिजवलेला उंदीर मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. वांद्र्यातील पापा पंचो दा ढाबा हा प्रसिद्ध ढाबा असून या ठिकाणी व्यवसायिक, बॉलीवुड सेलिब्रिटी जेवायला यायचे. दरम्यान या ढाब्यावर एफडीएने कारवाई करून ह्या ढाब्याला सील ठोकण्यात आले. दरम्यान एफडीएने मुंबईतील बडे रेस्टोरंट आणि हॉटेल, ढाबा यांची यादी तयार करून या हॉटेलच्या किचनच्या स्वच्छता तेथील खाद्य पदार्थांची तपासणी सुरू केली आहे. एफडीए ने एफडीएचे सहआयुक्त शैलेश आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार केले आहे. या पथकाने मागील १२दिवसात ६८ हॉटेलचे किचन, त्यांचे परवाने तपासले असून त्यापैकी अनेक हॉटेल मध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यापैकी कुलाबा येथील बडेमिया, माहीम येथील दिल्ली दरबार, गोवंडी येथील ‘क्लाउड किचन आउटलेट हायपर किचेन फूडटेक प्रायव्हेट लिमिटेड ‘ या हॉटेलला (Hotels Inspection) टाळे टोकण्यात आले आहे.
तसेच एफडीएच्या तपासणी दरम्यान कृष्णा फास्टफूड आणि पॅराडाईज होम किचनने स्वच्छता तसेच अनेक अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे. कृष्णा फास्टफूडला १५ हजार रुपये, तर पॅराडाइज होम किचनला ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एफडीएच्या एका अधिकाऱ्याने म्हणण्यानुसार अनेक हॉटेल (Hotels Inspection) आणि त्यांच्या किचन मध्ये अनेक त्रुटी आणि अस्वछता आढळून आल्या आहेत. आम्ही प्रत्येक रेस्टॉरंटमधून नमुने गोळा केले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community