Crime News : कांदिवलीत वृद्ध पत्नीवर चाकूने हल्ला करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

261
Crime News : कांदिवलीत वृद्ध पत्नीवर चाकूने हल्ला करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
Crime News : कांदिवलीत वृद्ध पत्नीवर चाकूने हल्ला करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

एका खाजगी कंपनीच्या ८० वर्षीय माजी सीईओने पत्नी आणि स्वतःच्या आजारपणाला कंटाळून अंथरुणाला खिळलेल्या ७५ वर्षीय पत्नीवर चाकूने हल्ला करून स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्स येथे घडली. दोघांनाही उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी समता नगर पोलिसांनी पती विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

शकुंतला बल्लूर (७५) आणि विष्णुनाथ बल्लूर (८०) असे या जखमी वयोवृद्ध दाम्पत्यांचे नाव आहे. हे दाम्पत्य कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉम्प्लेक्स येथील ‘एव्हरशाईन मिलेनियम पॅराडाईज’ या उच्चभ्रू सोसायटीच्या इमारत क्रमांक ३ मध्ये राहण्यास आहे. त्यांना एक मुलगा असून मागील २५ वर्षांपासून तो अमेरिकेत स्थायिक झाला आहे. विष्णुनाथ हे एका खाजगी कंपनीचे सीईओ होते. मागील काही वर्षांपासून त्यांची पत्नी आजारी असून ती अंथरुणाला खिळून आहे आणि विष्णुनाथ यांना देखील उच्च मधुमेहाचा त्रास असल्यामुळे ते वॉकर शिवाय चालू शकत नव्हते.

विष्णुनाथ यांनी घरकाम आणि स्वयंपाकासाठी एका महिलेला कामावर ठेवले होते. ही महिला दिवसभर काम करून घरी निघून जात होती. रात्री बल्लूर दाम्पत्य एकटेच राहत होते. मोलकरीण गेल्यानंतर पत्नीची देखभाल विष्णुनाथ यांनाच करावी लागत होती. स्वतःचे आजारपण आणि अंथरुणाला खिळून असणाऱ्या पत्नीची देखभालीमुळे विष्णूनाथ कंटाळले होते. गुरुवारी रात्री त्यांनी पत्नीला मारून स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास विष्णुनाथ यांनी स्वयंपाक घरातून पाच वेगवेगळ्या चाकूचा संच घेऊन पत्नीच्या बेडरूम मध्ये गेले व झोपेत असलेल्या पत्नीवर चाकूने पाच ते सहा वेळा हल्ला करून तीला जखमी केले त्यानंतर स्वतःच्या मानेवर चाकू फिरवुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

(हेही वाचा – Raksha Bandhan : कुरिअरच्या जमान्यातही राख्या पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी)

सकाळी ९ वाजता मोलकरीण घरी आली व तिने दार उघडून आता प्रवेश करताच घरातील दृश्य बघून घाबरली व तीने शेजाऱ्यांना बोलावून घेतले. दरम्यान, समता नगर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेल्या बल्लूर दाम्पत्यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. शकुंतला या गंभीर जखमी होत्या व विष्णुनाथ यांच्या मानेवर जखम होती. डॉक्टरांनी दोघांवर उपचार करून दोघांना रुग्णालयात दाखल करून घेतले. पोलिसांनी विष्णुनाथ यांचा जबाब नोंदवला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आजारपणाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी विष्णुनाथ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अमेरिकेत असणाऱ्या मुलाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. शकुंतला यांची प्रकृती गंभीर असून विष्णुनाथ यांना उच्च मधुमेह त्यात मानेला गंभीर जखम असल्यामुळे दोघांवर उपचार सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.