सांताक्रूझ येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या ३ ते ४ विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिकेने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पालकांच्या तक्रारीवरून शाळेने स्वतःहून शिक्षिकेवर कडक कारवाई करून सांताक्रूझ पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ५० वर्षीय शिक्षिकेवर मारहाण करणे, अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
शुभांगी उबाळे असे या शिक्षिकेचे नाव आहे. सांताक्रूझ पश्चिम येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्या पाहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवतात. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक मुख्याध्यापकांकडे तक्रार घेऊन आले होते, आमच्या मुलांना शिक्षिका उबाळे यांनी बेदम मारहाण केली असून मुले घाबरली आहेत. ती शाळेत येण्यास घाबरत असल्याची तक्रार पालकांनी केली.
मुख्याध्यापकानी खात्री करून घेण्यासाठी शाळेत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. सीसीटीव्ही पाहिल्यानंतर शुभांगी उबाळे या शिक्षिका वर्गात तीन विद्यार्थ्यांना टेबलजवळ बोलावून त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत असल्याचे दिसले. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पालकांकडून शिक्षिका शुभांगी उबाळे यांच्या विरोधात आलेल्या लेखी तक्रारीवरून उबाळे यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावून सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सांताक्रूझ पोलिसांनी शिक्षिकेवर मारहाण करणे,अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.
Join Our WhatsApp Community