आयकर विभागाने (Income Tax Department) काँग्रेसची चार बँक खाती गोठवली आहेत. शुक्रवारी काँग्रेस नेते आणि कोषाध्यक्ष अजय माकन यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, आयकर विभागाने त्यांच्या पक्षाची बँक खाती गोठवली आहेत. युवक काँग्रेसचे बँक खातेही गोठवण्यात आले आहे. माकन म्हणाले, सध्या आमच्याकडे खर्च करण्यासाठी, वीजबिल भरण्यासाठी, कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नाहीत. प्रत्येक गोष्टीवर परिणाम होत आहे. प्राप्तिकर विभागाने २१० कोटींच्या वसुलीचे आदेश दिले आहेत. मात्र, आयटी न्यायाधिकरणाने बुधवारपर्यंत खात्यांवरील फ्रीज उठवला आहे.
अजय माकन म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी आम्हाला माहिती मिळाली की आम्ही जे धनादेश देत आहोत त्यांना बँकेकडून क्लिअरन्स मिळत नाही. आम्ही तपास केला तेव्हा आम्हाला कळले की, देशातील प्रमुख विरोधी पक्षाची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत. काँग्रेसचे खाते कुलूपबंद झाले आहे.
(हेही वाचा – MCGM : मुंबईत ७७ ठिकाणी सामुदायिक शौचालयांच्या बांधकामांना सुरुवात, पश्चिम उपनगरात गती संथ)
‘आयकर विभागाने किती दंड ठोठावला आहे?’
आयकर विभागाने काँग्रेस आणि युवक काँग्रेसशी जोडलेली चार बँक खाती गोठवली आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे बँक खाते गोठवल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी युवक काँग्रेसचे बँक खाते गोठवण्यात आले. या दोघांच्या गोठवलेल्या खात्यांमधून प्राप्तिकर विभागाने २१० कोटी रुपयांची वसुली मागितली आहे. म्हणजेच काँग्रेसला ही रक्कम आयकर विभागाला दंड म्हणून भरावी लागणार आहे.
खाती का गोठवली?
हे संपूर्ण प्रकरण २०१८-२०१९ च्या आयकर रिटर्नशी संबंधित आहे. आयकर विभागाने काँग्रेसकडून दंड म्हणून २१० कोटी रुपयांची वसुली मागितली आहे. माकन यांच्या मते या कारवाईमागे दोन कारणे आहेत. प्रथम- आम्हाला आमच्या खात्याशी संबंधित माहिती ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत आयकर विभागाला द्यायची होती. त्यावेळी रिटर्न ४०-४५ दिवस उशिरा सादर केले जात होते. सहसा लोकांना १०-१५ दिवस उशीर होतो. दुसरे कारण म्हणजे २०१८-१९ हे निवडणुकीचे वर्ष होते. त्या निवडणुकीच्या वर्षात काँग्रेसने १९९ कोटी रुपये खर्च केले होते. त्यापैकी १४ लाख ४० हजार रुपये काँग्रेस खासदार आणि आमदारांनी त्यांच्या पगाराच्या रूपात जमा केले होते. हे पैसे रोख स्वरूपात जमा करण्यात आले. रोख रक्कम मिळाल्यामुळे आयकर विभागाने काँग्रेसला २१० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community