सैफी रुग्णालयातील रुग्णाचा मृत्यू; ‘या’ कारणामुळे बनावट इंजेक्शनचे प्रकरण उघड

चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात बनावट इंजेक्शनच्या वापरामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर सुरु असलेल्या तपासात अनेक बाबी उघडकीस आल्या आहेत. अटक केलेल्या फार्मासिस्टपैकी तीन आरोपी एमक्युआर कंपनीकडून थेट इंजेक्शनचा साठा विकत घेत होते. तिन्ही फार्मासिस्ट खरेदीपेक्षाही कमी किमतीत इंजेक्शन बाजारात विकत होते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर संशय आला होता.

एमक्युआर कंपनीच्या ऑरोफेर एफसीएम इंजेक्शनचा बनावट साठा दिल्लीतून आल्याचे उघडकीस आले आहे. सैफी रुग्णालयात ऑरोफेर एफसीएम इंजेक्शनचा बनावट साठा वितरित झालेला बॉक्स दिल्लीतून आल्याची माहिती अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरून दिली.

( हेही वाचा : उदित नारायण, कुमार शानू, रणवीर शोरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित )

बनावट इंजेक्शन आढळून आलेल्या बॉक्समधील चार हजार इंजेक्शन एमक्युअर कंपनीने बाजारातून परत मागावले. या प्रकरणी अकरा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यापैकी काही फार्मा सेंटर दिल्लीतील आहे. तपासणी अंती दिल्लीतूनच मुंबईत, ठाणे, पुणे आणि इतर ठिकाणी बनावट इंजेक्शनचा साठा पोहोचल्याचे अधिकाऱ्यांना समजले.

ऑक्टोबरमधील घटना

ऑक्टोबर महिन्यात ५६ वर्षीय रुग्णाला चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाला उपचारदम्यान ऑरोफर एफसीएम इंजेक्शन दिले गेले. या इंजेक्शननंतर रुग्णाची प्रकृती बिघडल्याने त्याला अतिदक्षता विभागाने हलवण्यात आले. दोन दिवसानंतर रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत सैफी रुग्णालयातील इंजेक्शनचे नमुने तसेच देशभरातील बाजारात उपलब्ध असलेले नमुने एफडीएने संबंधित कंपनीला परत घेण्याचे निर्देश दिले. जानेवारी महिन्यात प्रयोगशाळेचा अहवाल मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने व्ही.पी.रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच सैफी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरला नोटीस जारी केली.

एमक्युअर कंपनीला आली होती पूर्वकल्पना

कंपनीचे नाव वापरून बाजारात बनावट इंजेक्शन विकले जात असल्याची पूर्वकल्पना एमक्युअर कंपनीला जुलै महिन्यातच आली होती. जुलै महिन्यात याबाबतीत कंपनीने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते. याबाबतीत संबंधितांची माहिती मिळाल्यास कारवाई केली जाईल, असे कंपनीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. सैफी रुग्णालयातील घटना उघडकीस आल्यानंतर कंपनीच्या प्रवक्त्याने बनावट इंजेक्शन प्रकरणी कंपनी जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र तपशील देण्यास नकार दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here