मुंबई शहराला विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यात येणार असल्याची चर्चा मागील महिन्याभरापासून पोलीस दलात सुरू होती. अखेर राज्य सरकारने हे पद तयार करून त्यावर देवेन भारती यांची नियुक्ती केली. मुंबईला विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यासाठी सरकारला गरज वाटली, त्यानुसार सरकारने या पदाची निर्मिती करून त्यावर नियुक्तीही केली. ‘हिंदुस्थान पोस्ट’ ने सर्वप्रथम याविषयीचे वृत्त दिले होते.
देवेन भारती होते चर्चेत
मुंबईला विशेष पोलीस आयुक्त हे पद नव्याने निर्माण करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून सरकारमध्ये हालचाली सुरू होत्या. या पदावर अधिका-यांची नेमणूक करण्यासाठी अनेक ज्येष्ठ आयपीएस अधिकारी यांची नावे चर्चेत होती. या ज्येष्ठ अधिकाऱ्यांपैकी देवेन भारती यांच्या नावाची जोरदार चर्चा मुंबई पोलीस दलात सुरू होती. त्यानुसार राज्य सरकारने अखेर या पदावर देवेन भारती यांची नियुक्ती केली. मुंबई पोलीस आयुक्त हे पद आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये मानाचे पद मानले जाते. मुंबईचे पोलीस आयुक्त बनावे, असे प्रत्येक आयपीएस अधिकाऱ्याना वाटते. वर्षानुवर्षापासून मुंबई पोलीस दलात पोलीस आयुक्त या पदाव्यतिरिक्त मुंबईत ५ सहपोलीस आयुक्त आहेत. प्रशासन, गुन्हे, कायदा व सुव्यवस्था, आर्थिक गुन्हे शाखा आणि वाहतूक विभाग या पाच जागांवर सहपोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी असून त्यांच्यावर पोलीस आयुक्त हे पद आहेत.