मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनापूर्वीच जालन्यातील ४७ वर्षीय आंदोलनकर्त्याने मुंबईतील वांद्रे पूर्व येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे. सुनील बाबुराव कावळे असे या आंदोलनकर्त्याचे नाव आहे. या आंदोलनकर्त्याच्या आत्महत्येमुळे मराठा आंदोलन चिघळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maratha Reservation)
खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्युची नोंद करून मृतदेह सायन रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांना मृतदेह जवळ मिळून आलेल्या बॅगेत ४ पानांची सुसाईड नोट मिळून आली असून, पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. सुनील बाबुराव कावळे हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुका चिकणगाव येथे राहणारे होते. २४ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी सुनील कावळे हे मुंबईत आले होते. बुधवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास सुनील कावळे यांचा मृतदेह वांद्रे पूर्व बीकेसीला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून खाली गळफास लावलेल्या अवस्थेत मिळून आला. (Maratha Reservation)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : मुख्यमंत्री व नार्वेकरांची ‘वर्षा’वर बंद दाराआड चर्चा, नेमकं काय घडतंय)
घटनास्थळी दाखल झालेल्या खेरवाडी पोलीसांनी मृतदेह खाली उतरवला असता मृतदेहाच्या अंगावर असलेल्या पांढऱ्या शर्ट वर पूर्णपणे लाल अक्षराने ‘मिशन मराठा आरक्षण’ असे लिहलेले होते आणि पाठीवर बॅग लावलेली होती. पोलिसांनी बॅग ताब्यात घेऊन कावळे याला उपचारासाठी सायन रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्या नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात असलेल्या शवविच्छेदन विभागात पाठविण्यात आला आहे. (Maratha Reservation)
खेरवाडी पोलिसांनी मृतदेहा जवळ मिळून आलेल्या बॅगेत ४ पानांची सुसाईड नोट मिळून आली असून त्यात मराठा समाजाला उद्देशून “मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने एकत्र यावे, कोणी काही बोलू द्या त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, २४ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी सर्वांनी एकत्रित यावे असे लिहून शेवटी मला मोठ्या मनाने माफ करा, मी क्षमा मागतो सर्वांनी मला माफ करा” असे सुसाईड नोट मध्ये लिहण्यात आले आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेऊन अपमृत्यूची नोंद केलेली असून अधिक तपास सुरू आहे. (Maratha Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community