रेल्वे प्रवासातील शॉर्टकटमुळे हरवले २३ लाखांचे दागिने; २४ तासांत पोलिसांनी शोधले

118
ओर्डीनन्स फॅक्टरीत ‘सिनियर मेडिकल ऑफिसर’ असणाऱ्या व्यक्तीने ट्रेनचा मुख्य थांबा (स्थानक) येण्यापूर्वी अगोदरच्या स्थानकावर उतरून ‘शॉर्टकट’ मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात दागिन्यांनी भरलेली बॅग ट्रेनमध्ये राहून गेली होती, अखेर लोहमार्ग पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी ही बॅग अहमदाबाद येथून एका वयोवृद्ध दाम्पत्यांच्या घरात मिळाली. या बॅगेत २३ लाख रुपये किंमतीचे दागिने होते. दागिन्यांनी भरलेली बॅग एका जेष्ठ नागरिक असलेल्या दाम्पत्याच्या हाती लागली. त्यांनी बॅग पोलिसांच्या ताब्यात देण्यापेक्षा बॅग घेऊन अहमदाबाद येथे निघून गेले होते. अखेर लोहमार्ग गुन्हे शाखा आणि कल्याण रेल्वे पोलिसांनी या दाम्पत्याचा शोध घेत २४ तासांच्या आत दागिन्यांनी भरलेली बॅग हस्तगत केली.
 
अंबरनाथच्या ओर्डीनन्स फॅक्टरीत ‘सिनियर मेडिकल ऑफिसर’ असणारे अधिकारी हे अंबरनाथ येथे कुटुंबियांसह राहत आहेत. हे अधिकारी कुटुंबासह मुलीच्या सासरी एका समारंभासाठी हैद्राबाद येथे गेले होते, तेथून परतत असतांना मुलीने वडिलांकडे दागिन्यांनी भरलेली बॅग दिली होती व मुलगी नंतर मुंबईत येणार होती. १ फेब्रुवारी रोजी हैद्राबाद एक्स्प्रेसने कल्याणकडे येण्यासाठी कुटुंबासह निघाले होते. २ फेब्रुवारी रोजी दुपारी हैद्राबाद एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकापूर्वी उल्हासनगर येथे थांबली असता उल्हासनगर येथून अंबरनाथला घरी जाण्यास जवळ पडेल म्हणून या अधिकाऱ्याने शॉर्टकट् मारण्यासाठी उल्हासनगर येथे उतरले, घाईगडबडीत त्यांची दागिन्यांची ब्रिफकेश ट्रेनमध्ये राहिली आणि ट्रेन कल्याणच्या दिशेने रवाना झाली. दागिन्यांची बॅग ट्रेनमध्ये विसरल्याचे लक्षात येताच या अधिकाऱ्याने उल्हासनगर येथून लोकल ट्रेनने कल्याण गाठले, परंतु ट्रेन दादरच्या दिशेने रवाना झाली होती.
 
अखेर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी तक्रार दिली, कल्याण रेल्वे पोलिसांनी प्रथम दादर रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साधून दादर हैद्राबाद एक्सप्रेसमध्ये दागिन्यांची बॅग शोधण्यासाठी सूचना दिली. दादर रेल्वे पोलिसांना ती बॅग ट्रेनच्या बोगीत मिळाली नाही. या अधिका-यांनी त्यांच्या सोबत एक वृद्ध दाम्पत्य प्रवास करीत होते, त्यांनी बॅग चोरी केली असावी अशी तक्रार दाखल केली. अखेर लोहमार्ग गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक ए. यु. शेख, कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी तात्काळ आपले पथक या दाम्पत्यांच्या मागावर पाठवले असता हे दाम्पत्य अहमदाबाद येथे रवाना झाल्याचे कळले. पोलिसांचे एक पथक अहमदाबाद येथे रवाना झाले व या दाम्पत्याचा शोध घेऊन त्यांच्या घरी पोहचले आणि सोन्याच्या दागिन्यांची बॅग ताब्यात घेतली. सर्व दागिने बॅगेत मिळाले असून या दाम्पत्यानी बॅग न उघडल्यामुळे त्यांना देखील या बॅगेत काय होते हे कळू शकले नव्हते. विसरलेली दागिन्यांची बॅग मिळाल्याचे कळताच या अधिका-याचा अखेर जीव भांड्यात पडला आणि २४ तासांच्या आत बॅग शोधून काढणाऱ्या रेल्वे पोलिसांचे त्यांनी मनापासून आभार मानले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.