कसारा – सीएसएमटी लोकल ट्रेनमध्ये २० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग मिळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. कल्याण रेल्वे पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेऊन बॅगेचा मूळ मालक शोधत असताना अनेक जणांनी पोलीस ठाण्यात येऊन पैशाने भरलेली बॅगेवर दावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र २४ तासांनी या बॅगेचा मूळ मालक मिळून आला असून आयकर विभागाकडून उत्तर आल्यानंतर ही बॅग मूळ मालकाला सोपविण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Kalyan News)
नाशिक येथून देव दर्शन करून मराठी तरुणाचा एका ग्रुपने कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जाणारी लोकल ट्रेन पकडली होती. १५ जणांचा हा ग्रुप कल्याण रेल्वे स्थानकात उतरला,त्यावेळी या ग्रुपमधील एकाने ग्रुपमधील कोणाची तरी बॅग असेल म्हणून ट्रेनच्या रॅक वरील भलतीच बॅग घेऊन हा ग्रुप कल्याण रेल्वे स्थानकात उतरला. ग्रुप मधील प्रत्येक जणांनी आपापली बॅग पाठिवर घेतली, एक बॅग उरली होती, ती बॅग कोणाची आहे म्हणून प्रत्येकाने एकमेकांना विचारले परंतु ती बॅग ग्रुप मधील कोणाची नव्हती. (Kalyan News)
चुकून आपण दुसऱ्याची बॅग उचलून आलो हे लक्षात येताच ज्याची बॅग आहे त्याची ओळख पटविण्यासाठी बॅगेत काही आहे का तपासण्यासाठी ग्रुप मधील एकाने बॅगेची चैन उघडताच सर्वाना धक्काच बसला. बॅगेत नोटांचे बंडल बघून सर्व जण अवाक झाले.मात्र एवढे मोठं पैशांचे घबाड बघुन ग्रुप मधील एकाचीही नियत फिरली नाही, आणि सर्वांनी विचार करून ही बॅग कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिली.कल्याण रेल्वे पोलिस देखील पैशांनी भरलेली बॅग बघून चकित झाले, पोलिसांनी पंचासमक्ष तात्काळ बॅग उघडून बॅगेतील रोकड मोजली असता २०लाख रुपये त्या बॅगेत होते, तसेच काही कपडे आणि आवश्यक वस्तू बॅगेत होत्या, परंतु बॅगेच्या मालकाची ओळख पटेल अशी कुठलीही वस्तू बॅगेत मिळून आली नाही. (Kalyan News)
कल्याण रेल्वे पोलिसांनी कसारा ते कल्याण दरम्यानचे रेल्वे स्थानकावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळवले. दरम्यान पोलिसांना पैशांनी भरलेली बॅग मिळाली असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, काही जण रेल्वे पोलीस ठाण्यात बॅग आपली असल्याचा दावा करण्यासाठी देखील आले, मात्र पोलिसांच्या प्रश्नाच्या भडिमारामुळे त्यांचे पितळ उघडे पडून त्यांनी पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला. अखेर बुधवारी एक व्यक्ती पोलीस ठाण्यात आला आणि त्याने बॅग त्याची असल्याचा दावा केला, पोलिसांनी त्याला विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे शांतपणे दिली. पोलिसांना खात्री पटली परंतु २० लाख रुपयांचा मामला असल्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्याला बॅग ताब्यात न देता, सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि कसारा स्थानकावरील फुटेज मध्ये पैशांनी भरलेली बॅग त्याच व्यक्तीकडे दिसून आली. (Kalyan News)
पोलिसांनी त्याच्याकडे त्याची सर्व माहिती विचारली असता त्याचे नाव सांगून त्याचे कुटूंब गिरगाव येथे राहतात, धुळ्यात त्याचा सोलर चा व्यवसाय असून तो व्यवसायाची रोकड घेऊन मुंबईकडे निघाला होता, धुळ्याहून तो चाळीसगाव येथे एका नातेवाईकांचे कार्य आटोपून संभाजीनगर येथे गेला, तेथून तो कसारा येथे आला व कसारा येथून मुंबईला येण्यासाठी त्याने लोकल ट्रेन पकडली, स्वतःजवळ असलेली नोटांनी भरलेली बॅग त्याने ट्रेन च्या रॅकवर ठेवली, प्रवासात दमल्यामुळे त्याला ट्रेन मध्ये झोप लागली, आणि डोंबिवलीत त्याला जाग आली तेव्हा बॅग रॅक वर नसल्याचे बघून तो घाबरला, त्याने ट्रेन मध्ये शोध घेतला, परंतु बॅग मिळून आली नाही. मित्रांना फोन करून त्याने मित्रांच्या सल्ल्यानुसार सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे गाठले आणि बॅगेची चौकशी केली. सीएसएमटी पोलिसांनी त्यांना कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात चौकशी करण्यासाठी सांगितले. व्यवसायिक हा कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात आला व त्याला बॅग पोलिसांच्या ताब्यात असल्याचे कळले आणि त्याचा जीव भांड्यात पडला. (Kalyan News)
त्याने पोलिसांना सांगितलेले सर्व खात्री करून बॅगेचा मूळ मालक तीच व्यक्ती असल्याची खात्री केली, परंतु या रोकड संदर्भात पोलिसांनी आयकर विभागाकडे संपर्क साधला असून आयकर विभागाकडून जो पर्यत या संदर्भात सकारात्मक उत्तर येत नाही तो पर्यत ही बॅग कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात राहणार असून सकारात्मक उत्तर आल्यावर ही बॅग मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात येईल असे कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले. (Kalyan News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community