गर्भवती महिलेला मारहाण आणि तिचा विनयभंग केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून या घटनेची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे.
नक्की काय घडले?
दिनेश महाजन असे या हवालदाराचे नाव आहे. महाजन नवी मुंबई पोलीस मुख्यालयात तैनात आहे. बेलापूर येथे राहणारी २६ वर्षीय गर्भवती महिला ही पतीसोबत मंगळवारी सायंकाळी सोनोग्राफी करण्यासाठी मोटारसायकल वरून जात होते. त्याच वेळी खारघर मेट्रो स्थानकाजवळ एका मोटारीने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या दाम्पत्याने मोटारसायकल थांबवून मोटार चालकाला जाब विचारला असता दाम्पत्य आणि मोटार चालक यांच्यात वाद झाला.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार मोटार चालक दिनेश महाजन यांनी गाडीच्या डॅशबोर्डवर ‘पोलीस’ असा फलक लावला होता आणि मी पोलिसात असल्याचे सांगून दाम्पत्याला धमकावले. तसेच महाजन याने पीडितेच्या पतीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता पीडितेने मध्यस्थी केली. त्यावेळी महाजन याने पीडितेला मारहाण केली. या घटनेनंतर दाम्पत्याने खारघर पोलिसांकडे धाव घेतली.
(हेही वाचा – अटकेच्या भीतीने सीएची इगतपुरी येथे आत्महत्या)
आम्ही गुन्हा दाखल केला असून दिनेश महाजन याला नोटीस बजावली आहे, असे खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी सांगितले. याप्रकरणी महाजन यांच्यावर रॅश ड्रायव्हिंग, स्वेच्छेने दुखापत करणे आणि महिलेच्या विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.