एका बाजूला पुणे येथे कोयता गँगच्या दहशतीने नागरिक धास्तावले आहे, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असताना आता डोंबिवलीतही कोयता गॅंग सक्रिय झाली आहे. शनिवार, १ एप्रिल रोजी रात्री कोयता हातात घेऊन पाचजणांनी डोंबिवली पूर्वेतील एक ज्येष्ठ महिला आणि तिचा आजारी पती यांच्या घरात घुसून धुडगूस घातला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली तर पुन्हा मारण्याची धमकी दिली. या कोयता टोळीमुळे डोंबिवलीत भीतीचे वातावरण पसरले आहे.
जितू निशाद (४०) हा कोयता टोळीचा प्रमुख असून त्याच्या सोबतीला पाच गुंड आहेत. जितू हा कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. या कोयता टोळीविरुद्ध बेबी मधुकर देसले यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री १० वाजता तक्रारदार महिला बेबी आणि तिचा आजारी पती घरात एकटे होते. त्यांच्या दारावर अज्ञात पाच व्यक्ती हातात कोयते घेऊन बेबी यांचा मुलगा मन्या तू घराबाहेर ये, तुला ठार मारतो, असे बोलत दरवाजावर लाथाबुक्का आणि ओरडा करत होते. या पाच जणांमध्ये जितू निशाद हा गुंड आणि त्याचा साथीदार हातात कोयते घेऊन आले होते. मुलगा घरात नाही, असे बेबी पाचजणांना खिडकीतून सांगत होत्या. तो घरातच आहे, असे बोलत जितूने महिलेला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. दरवाजा उघडला नसता तर आपण दरवाजा तोडून घरात घुसू अशी धमकी त्याने दिली होती. बेबी यांनी दरवाजा उघडताच हातात कोयते नाचवत जितूने बेबी यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर कोयता उगारण्यात आला. आता आपल्याला ठार मारले जाईल या भीतीने बेबीने बचावासाठी ओरडा केला. तेव्हा शेजारी, पादचारी बेबी यांच्या घरात बचावासाठी शिरले. त्यावेळी जितू आणि त्याच्या साथीदारांनी बचावासाठी आलेल्या नागरिकांना तुम्ही मध्ये पडलात तर तुम्हाला कोयत्याने मारू, अशी धमकी दिली. आणि टोळी हातात कोयते घेऊन रस्त्यावर नाचू लागली. बेभान झालेली टोळी घरात घुसेल या भीतीने परिसरातील रहिवाशांनी घराचे दरवाजे बंद केले.
(हेही वाचा ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेला छेद देणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता! – रमेश शिंदे)
Join Our WhatsApp Community