पुण्यातील कोयता गॅंगचे लोण हळूहळू मुंबईत उतरू लागले आहे. शुक्रवारी सायंकाळी मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या बाजारात गुंड प्रवृत्तीचा एक तरुण हातात कोयता आणि सुरा घेऊन रिक्षाचालक, फेरीवाले आणि दुकानदार यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटत असतांना मुलुंड पोलीस ठाण्यातील एका हवालदाराने धाडस दाखवून या गुंडाला कोयता व सुरा या हत्यारांसह अटक केली आहे.
संभाजी जाधव असे या धाडसी पोलीस हवालदाराचे नाव आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संभाजी जाधव यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हवालदार जाधव यांना एका व्यक्तीने मोबाईल फोनवर कॉल करून एक व्यक्ती एका हातात कोयता आणि दुसऱ्या हातात सुरा घेऊन रस्त्यावर रिक्षा चालकांना थांबवून रिक्षा चालक आणि प्रवाशाना कोयत्याच्या धाकावर लूटत आहे. ही माहिती मिळताच साध्या वेशात असलेल्या पोलीस हवालदारांनी मोटारसायकलवरून अंबिका नगर परिसर गाठला.
त्यावेळी एक जण एका फेरीवाल्याच्या कमेरला कोयता लावून त्याच्याकडे पैशांची मागणी करीत होता. जाधव यांच्याकडे कुठलेही शस्त्र नसताना त्यांनी धाडस दाखवून ग्राहक बनून त्या फेरीवाल्याकडे पोहचले व फेरीवाल्याकडे भाव विचारण्याच्या बहाणा करून या गुंडाचे लक्ष विचलित केले आणि जाधव यांनी वेळ न दडवता या गुंडाच्या पायावर लाथेने जोरदार प्रहार करून त्याला खाली पाडले. क्षणाचाही विलंब न करता जाधव यांनी प्रथम त्याच्या हातातील कोयता आणि सुरा ताब्यात घेऊन त्यानंतर त्याला इतर नागरिकांच्या मदतीने पकडून पोलीसांची मदत मागवली.
पोलिसांची मदत येईपर्यंत संभाजी जाधव यांनी या गुंडाला पकडून ठेवले होते. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या गुंडाच्या मुसक्या आवळत त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तमिळ आरसन उर्फ वेल्लू जयपाल हरिजन (२५) असे ताब्यात घेण्यात आलेल्या गुंडाचे नाव असून तो मुलुंड येथील अंबिका नगर झोपडपट्टीमध्ये राहणारा आहे. तामिळ याची परिसरात दहशत असून दिवसा ढवळ्या देखील तो रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून लूटत होता.
त्याच बरोबर दुकानदार फेरीवाले, रिक्षाचालक यांना शस्त्राचा धाक दाखवुन लुटत होता. त्याच्या दहशतीमुळे त्याच्या विरुद्ध कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. तामिळ आरसन उर्फ वेल्लू याला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. वेल्लूच्या अटकेमुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. दरम्यान, पोलीस हवालदार संभाजी जाधव यांनी निशस्त्र असून देखील जीवाची पर्वा न करता धाडसाने या गुंडाला अटक केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून स्थानिकांकडून तसेच वरिष्ठांकडून संभाजी जाधव यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community