Kurla Bus Accident : बसचे ब्रेक निकामी झालेच नाहीत; अपघाताचे कारण शोधण्यासाठी घेणार तज्ज्ञांची मदत

292
Best Bus : खासगी बस चालकांची निष्ठा प्रवाशांऐवजी किलोमीटरशी; माजी विरोधी पक्षनेत्याचा आरोप
कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर अनेक तर्क वितर्क काढले जात आहे, बस चालक संजय मोरे याने मद्यप्राशन केले होते, बसचे ब्रेक निकामी झाले होते, काही जणांनी तर हा दहशतवादी हल्ला असल्याची अफवा उडवून दिली होती, परंतु यातील कुठलाही प्रकार घडला नसल्याचे पोलीस आणि आरटीओच्या तपासात समोर आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बस चालकाने कुठल्याही प्रकारची नशा केलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे, तर आरटीओच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बसचे ब्रेक निकामी झालेले नसून बसमध्ये वेगळाच तांत्रिक बिघाड झाला असावा अशी शक्यता वर्तवली आहे. बसमध्ये नक्की काय बिघाड झाला होता, हे शोधण्यासाठी संबंधित तज्ज्ञांचे पथक काम करीत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Kurla Bus Accident)
कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात ७ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर जवळपास ४९ जण जखमी झाले असून जखमीमध्ये ४ पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या भीषण अपघात २५ ते ३० लहान मोठ्या वाहनाचे नुकसान झाले आहे. कुर्ला पश्चिम स्थानक ते अंधेरी स्थानक येथे निघालेल्या एसी ३३२ क्रमांकाची बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस ३०० मीटर अंतरापर्यंत वाटेत येईल त्यांना धडक देत एका कमाणीच्या भिंतीवर जाऊन  आदळली, हा अपघात झाला त्या वेळी अपघातग्रस्त बसमध्ये ५० ते ५२ प्रवासी प्रवास करीत होते, सुदैवाने त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. (Kurla Bus Accident)
या अपघातानंतर अनेक चर्चाना उधाण आले होते, बेस्ट बस चालकाने मद्यप्राशन केले होते, नशेत त्याच्याकडून अपघात झाला असावा, तसेच बस चे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला, तर हा अपघात म्हणजे एक घातपात असल्याची चर्चा सुरू होती. स्थानिक नागरिकांमध्ये ही चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती, मात्र परिस्थिती बघता नक्की अपघाताचे कारण कळू शकते नव्हते. सोमवारी मध्यरात्री  ताब्यात घेण्यात आलेल्या बस चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती, त्यात त्याने कुठलीही नशा केलेली नव्हती, त्याचा रक्तदाब नॉर्मल होता, मधुमेह देखील  नियंत्रणात होता असा अहवाल पोलिसांच्या हाती आला. (Kurla Bus Accident)
मध्यरात्री अपघातग्रस्त बसचे आरटीओ कडून ब्रेक तपासण्यात आले, ते देखील व्यवस्थित होते, यामुळे वरील दोन्ही चर्चांना पूर्णविराम मिळाला, तसेच घातपाताची शक्यता देखील नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.अपघातग्रस्त बस ही इलेक्ट्रिक बस असून ऑटोगियर आहे. बसचालक संजय मोरे याला इलेक्ट्रिक बस चालविण्याचा अनुभव नव्हता, १० दिवसांपूर्वी  तो बेस्टमध्ये कंत्राटपद्धतीने चालक म्हणून रुजू झाला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. (Kurla Bus Accident)
आरटीओच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार अपघातग्रस्त बसवरील चालक संजय मोरे याच्याकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना होता, तो यापूर्वी हंस ट्रॅव्हल्स या खाजगी कंपनीत चालक म्हणून काम करीत होता, त्याला अवजड वाहन चालविण्याचा अनुभव असला तरी इलेक्ट्रिक बस चालविण्याचा अनुभव नसावा, इलेक्ट्रिक बसला पॉवर स्टेरिंग असून त्याचे एक्सेलीटर जास्त हार्ड नसल्यामुळे त्याने एक्सेलीटरवर अधिक दबाव दिल्यामुळे बसचे नियंत्रण सुटले असावे आणि बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्नात तसेच प्रवासाच्या आरडाओरड मुळे तो गोंधळाला असावा व त्यातुन हा अपघात झाला असण्याची शक्यता आरटीओच्या सूत्राने वर्तवली आहे, किंवा बसमध्ये वेगळाच तांत्रिक बिघाड झाला असावा अशी शक्यता असून  बसमध्ये नक्की काय बिघाड झाला होता, हे शोधण्यासाठी संबंधित तज्ज्ञांचे पथक काम करीत आहे, लवकरच त्याचा अहवाल समोर येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Kurla Bus Accident)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.