लालबाग हत्याकांड : लखनौमधून एकाला घेतले ताब्यात, मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी मदत केल्याचा संशय

194

लालबाग हत्याकांड प्रकरणात उत्तर प्रदेशातून एकाला ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती हा अटक करण्यात आलेली आरोपी रिम्पलच्या सतत संपर्कात होता अशी माहिती समोर येत आहे. तसेच, त्याने रिम्पलला पुरावा नष्ट करण्यास मदत केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलेल्या या व्यक्तीला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नाही.

( हेही वाचा : राज्यात कोरोना आणि एच3एन2 चा दुहेरी अटॅक )

लालबाग येथील वीणा जैन हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिम्पल जैन हिचा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस तपासात रिम्पल नातेवाईकांसह पाच जणांच्या संपर्कात होती, त्यांचे जबाब नोंदविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच रिम्पलच्या सतत संपर्कात असणारा लालबाग परिसरातील २८ वर्षीय सँडविच विक्रेत्याला लखनौ येथून ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आले आहे. त्याच्याकडे या बाबत चौकशी सुरू असून त्याला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नसून अद्याप त्याला पोलिसांनी क्लिनचिट देखील दिलेली नाही. या व्यक्तीनेच रिम्पलला पुरावा नष्ट करण्यास मदत केली असावी असा संशय पोलिसांना आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २७ डिसेंबर रोजी पहाटे वीणा जैन या पहिल्या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृह येथे गेल्या होत्या, तेथून त्यांचा तोल जाऊन खाली कोसळल्या, त्यात त्यांना अंतर्गत इजा झाली होती. त्यावेळी हॉटेल मधील दोन कर्मचाऱ्यांना जखमी अवस्थेत तिला खोलीत घेऊन जाण्यासाठी मदत केली होती, वीणा जैन या ज्यावेळी पहिल्या मजल्यावरून खाली पडल्या, त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला होता अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आईला आपणच मारले असल्याचा आरोप आपल्यावर येईल या भितीने रिम्पलने आईचा मृतदेह दोन दिवस घरात ठेवला होता. त्यानंतर तिने पुरावा नष्ट करण्यासाठी आईच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कपाटात, पिंपात लपवून ठेवले होते असे आतापर्यंत झालेल्या पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच हे सर्व रिम्पल एकटी करू शकत नाही, असा संशय पोलिसांना असून त्यात तिला कोणी मदत केली तसेच सँडविच विक्रेत्याची त्यात काय भूमिका आहे हे तपासले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.