मुंबईतील गणेशोत्सव म्हटलं की, चोरांची चांगलीच चंगळ होते. मुंबईत दहा दिवस साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात मुंबईसह परराज्यातील चोरटे मुंबईत दहा दिवस डेरा टाकून बसतात आणि विसर्जनाच्या दिवशी लाखोंची कमाई करून रातोरात उडनछु होतात. चोरांकडून गणेशोत्सवाच्या काळात हा नित्यनियम न विसरता आठवणीने पाळला जात असतो. नवसाला पावणारा म्हणून ख्याती असणाऱ्या मुंबईतील लालबागचा राजाच्या विसर्जन सोहळा बघण्यासाठी उसळलेल्या गर्दीत चोरट्यांनी आपला हात साफ केला आहे. काळाचौकी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत जवळपास ३५ जणांच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या असून शुक्रवारी (२९ सप्टेंबर) सकाळ पासूनच चोरीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या बाहेर लोकांनी गर्दी केली आहे.
मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मुंबईसह राज्यभरातून लाखोंच्या संख्येने लोकं मुंबईत दाखल होतात. विसर्जन सोहळा आणि मिरवणूका पाहण्यासाठी सर्वात जास्त गर्दी लालबाग आणि गिरगाव चौपाटीवर असते. या गर्दीचा फायदा घेत परराज्यातून चोरी करण्यासाठी आलेल्या टोळ्यांचे सदस्य या गर्दीत मिसळून लोकांच्या गळ्यातील दागिने, मोबाईल फोन आणि पैशांची पाकीटे हातोहात लांबवतात. गुरुवारी एकट्या लालबाग परिसरातून शेकडो जणांचे मोबाईल फोन्स, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे, सोनसाखळ्या चोरट्यांकडून लांबविण्यात आलेल्या आहे. एकट्या काळाचौकी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यत जवळपास १२ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात मोबाईल चोरी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
पोलिसांनी प्रत्येक तक्रारदारांच्या तक्रारी नोंदवून ४ ते ५ तक्रारदार मिळून एक गुन्हा असे १२ गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहे. या १२ गुन्ह्यांमध्ये जवळपास ४० जणांचा वेगवेगळा ऐवज चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री उशिरा पर्यंत आलेल्या तक्रारीत १५ महागडे मोबाईल फोन्स, १२ मंगळसूत्र आणि सोनसाखळी, ४ पाकीटे आणि महिलांच्या पर्सचा समावेश असून एका गुन्ह्यात सव्वा लाख रुपये किमतीच्या लॅपटॉपचा समावेश आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने हिंदुस्थान पोस्टशी बोलतांना सांगितले की, लालबागच्या विसर्जन सोहळ्यात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी उसळली होती, त्यात अनेकांचे मोबाईल फोन आणि सोनसाखळी चोरीला गेल्या असल्याच्या तक्रारी दाखल करण्यात करण्यात आलेल्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरी आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात असल्याचे अधिकारी यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community