संतोष वाघ
काळबादेवी येथील एका आंगाडिया कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीला लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अवघ्या ८ तासांत अटक केली आहे. अटक केलेले तिघेही दक्षिण मुंबईतील एका सराईत गुंडांच्या टोळीत कार्यरत होते.
निलेश हरिहर तिवारी (४३) अभिराज शंकर खिलारी (३५) आणि सिल्वराज उर्फ काला सिलव्हा वेलुतंबी पिल्ले (४६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आंगाडिया कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी २५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. परंतु, त्यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने या तिघांनी त्यांच्याकडील ३३ लाख रुपयांचे दागिने लुटून पोबारा केला होता.
दरम्यान, अटक केलेल्या निलेश तिवारी या आरोपीवर खून, खंडणी, दंगल, गंभीर दुखापत यांसारखे ४ गंभीर गुन्हे असून, सिल्व्हा याच्यावर अशाप्रकारचे १७, तर अभिराज याच्यावर दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. सिल्व्हा याला मोक्का अंतर्गत देखील अटक झाली होती. या टोळीची दक्षिण मुंबईत दहशत असून, येथील बडे व्यापारी,आंगडियांकडून खंडणी गोळा करण्याचे काम ते करतात.
(हेही वाचा – त्रिपुरा : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना; विजेचा धक्का बसून ७ जणांचा मृत्यू, १८ जखमी)
झाले काय?
– २७ जून रोजी काळबादेवी येथील आंगडिया कुरिअर कंपनीचे कर्मचारी कोल्हापूर आणि पुणे येथे दागिन्यांचे पार्सल पोहचविण्यासाठी निघाले असता या तिघांनी त्यांना काळबादेवी परिसरात अडवून त्यांना शस्त्राचा धाक दाखवत २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी खंडणी देण्यास नकार देताच या तिघांनी त्यांच्या जवळील दागिन्यांची बॅग बळजबरीने खेचून पळ काढला.
– त्यानंतर याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात खंडणी, जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. कैलास करे, सपोनि.सुशीलकुमार वंजारी, प्रदीप भिंतांडे आणि पथकाने अवघ्या आठ तासांत या टोळीचा शोध घेऊन त्यांनी चोरलेल्या दागिन्यांसह अटक केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community