महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप्लिकेशनचे पाकिस्तान कनेक्शन ईडीच्या तपासात समोर आले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संरक्षणात महादेव ऑनलाइन बेटिंगचे अॅप्लिकेशन पाकिस्तान मध्ये वेगळ्या इस्लामिक नावाने चालवले जात असल्याची माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे. पाकिस्तानात सुरू करण्यात आलेल्या या अप्लिकेशन मधून मोठ्या प्रमाणात कमाई होत असल्याची ईडीने दिली आहे.
ईडीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, सौरभ चंद्राकरने महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपचे पाकिस्तानमध्ये इस्लामिक वर्जन सुरू केले आहे. कोविड-१९ नंतर चंद्रकर आणि त्याचा साथीदार रवी उप्पल यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संरक्षण आणि समर्थनासह पाकिस्तानमध्ये हे बेटिंग अॅप सुरू केले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी – कंपनीकडून पाकिस्तान मध्ये या बेटिंग अप्लिकेशनला संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येत असल्याची माहिती ईडीच्या तपासात समोर आले आहे.
चंद्राकर हे बेटिंग अॅप छत्तीसगडमधून ज्या पद्धतीने चालवत आहे त्याच पद्धतीने पाकिस्तानमध्ये हे अप्लिकेशन चालवले जात आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकरने २०२१ मध्ये पाकिस्तानमध्ये त्याचे बेटिंग अॅप ऑपरेट करण्यासाठी ३००ते ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. दाऊद इब्राहिम, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) तसेच इतर संस्था आणि राजकारण्यांना बेकायदेशीर बेटिंग अॅप पाकिस्तान मध्ये सुरू ठेवण्यासाठी तसेच संरक्षण मिळावे या साठी हवाला मार्फत मोठी रक्कम देण्यात आली असल्याचा आरोप आहे.(हेही वाचा-China : चीन दौऱ्याआधी नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांची भारताला मदत)
ईडी अधिकार्यांच्या म्हणण्या नुसार, चंद्रकरच्या पाकिस्तानी ऑनलाइन सट्टेबाजी व्यवसाय अॅपबाबत त्यांना नुकतीच एक गुप्त माहिती मिळाली आहे की, चंद्रकर हा ३० -७० अशा नफ्यात ऑनलाइन बेटिंग अॅप ऑपरेट करीत आहे. फेब्रुवारी-२०२३ मध्ये चंद्राकरच्या दुबईत झालेल्या लग्नादरम्यान, त्याचे काही पाकिस्तानी भागीदार, फ्रँचायझी मालक आणि डी-कंपनीशी संबंधित असलेले सहयोगी या सोहळ्यात सहभागी झाले होते. ईडीकडून या सोहळ्यात सहभागी झालेल्या पाकिस्तानी व्यवसायिक ,भागीदार , फ्रँचाईसी मालक आणि डी- कंपनीच्या लोकांची ओळख पटविण्यासाठी या लग्न सोहळ्याचे व्हिडिओ फुटेजचे विश्लेषण करीत आहे.
पाकिस्तान हा इस्लामिक देश असून या देशात जवळपास सर्व प्रकारच्या जुगारांवर बंदी आहे, यासाठी त्या ठिकाणी जुगारविरोधी कठोर कायदे करण्यात आलेले आहे.या देशातील कायदयात लॉटरीवर देखील बंदी आहे. जुगार कायद्याच्या उल्लंघनासाठी खूप मोठा दंड आहे, तसेच पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आहे. एवढा कठोर नियम असूनही, चंद्राकरचे बेटिंग अॅप पाकिस्तानमध्ये कार्यरत आहे आणि त्याच्या भारतीय महादेव बेटिंग अॅप प्रमाणेच क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, पोकर, पत्ते गेम आणि चान्स गेमसह विविध प्रकारचे जुगार ऑफर करत प्रचंड नफा कमावला जात आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकर आणि उप्पल दुबईमध्ये राहून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही ठिकाणी सट्टेबाजीचा व्यवसाय करतात. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाचा तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. यामुळे त्यांनी अद्याप बेटिंग अॅपमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीचे नाव उघड केलेले नाही. तपासाची दिशा सौरभ चंद्राकर वापरत असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाचा मागोवा घेण्यावर आहे. सट्टेबाजीच्या साम्राज्याला पाठिंबा देण्यासाठी भारतातून मिळणारी कमाई पाकिस्तानमध्ये गुंतवली जात आहे.
गुप्तचर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान-आधारित ऑनलाइन बेटिंग अॅप सध्या डी-कंपनीच्या लॉजिस्टिक प्रदात्याच्या अंतर्गत कराची, लाहोर, हैदराबाद आणि पाकिस्तानच्या अनेक राज्यांमध्ये कार्यरत आहे, तसेच त्याचे पाकिस्तान बेटिंग अॅप वापरकर्ता आयडी, निधी संकलन, वापरकर्ता क्रेडेन्शियल वितरण, ग्राहक प्रतिबद्धता आणि कमाई वितरणासाठी एका पेक्षा अधिक वेबसाइट आणि प्लॅटफॉर्म द्वारे ऑपरेट केले जाते. चंद्रकर आणि त्यांचे सहकारी, त्यांच्या महादेव अॅप ऑपरेशन्स प्रमाणेच, या पॅनेल ऑपरेशन्सद्वारे मिळणाऱ्या नफ्यांपैकी सुमारे ७० टक्के नफा नियंत्रित करतात. चंद्रकर आणि उप्पल यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या दुबईस्थित मुख्य कार्यालयातून पॅनेल आणि शाखांचे व्यवस्थापन केले जाते.