शेजारी राहणारे पत्नीला आपल्याविरुद्ध भडकावत होते, त्यामुळे पत्नी मुलासह आपल्याला सोडून गेल्याच्या संशयावरून मानसिक तणावात असणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीने शेजाऱ्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दक्षिण मुंबईत घडली. या हल्ल्यात ज्येष्ठ दाम्पत्यसह १८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी डी.बी.मार्ग पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की काय घडले?
चेतन रतनशी गाला (वय ५५) असे ताब्यात घेण्यात आलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. जयेंद्र मेस्त्री आणि ईला मेस्त्री या ज्येष्ठ दाम्पत्याचा आणि १८ वर्षीय जेनील नावाच्या मुलीचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून तिची आई स्नेहल ब्रम्हभट्ट (वय ४२) आणि इमारतीचा सफाई कर्मचारी प्रकाश वाघमारे असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. हल्लेखोर चेतन गाला हा पत्नी आणि तीन मुलासह दक्षिण मुंबईतील दादासाहेब भडकमकर मार्ग, पार्वती मेन्शन या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहण्यास होता. चेतन गाला याची आई आणि वडील दोन इमारत सोडून राहण्यास आहे. चेतन गाला यांचा गिरगाव येथे एक दुकान असून ते दुकान त्यांनी भाडेतत्वावर चालविण्यास दिले आहे, त्यातून येणाऱ्या भाड्यातून ते आपले संसाराचा गाडा चालवत होते. चेतन याचा स्वभाव संशयी होता आणि ते नेहमी पत्नीवर संशय घेत होते. त्यातून दोघात नेहमी खटके उडत असल्यामुळे पत्नी मुलासह दोन महिन्यांपूर्वीच माहेरी निघून गेली होती. दोन महिन्यापासून पत्नी मुले जवळ नसल्यामुळे चेतन गाला हे मानसिक तणावात होते.
शेजारी पत्नीला माझ्याविरुद्ध भडकावत असल्यामुळे पत्नी आपल्या सोडून गेली या संशयावरून चेतन नेहमी शेजाऱ्यासोबत वाद घालत होता, माझ्या पत्नीला माझ्याविरुद्ध तुम्ही भडकावले आणि म्हणून माझी पत्नी मला सोडून गेली, असा आरोप करून चेतन शेजारी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य आणि दुसऱ्या शेजाऱ्यासोबत भांडत होता. शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास चेतन याने घरातून सुरा आणून त्याने शेजारी राहणारे ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य जयेंद्र मेस्त्री आणि त्याची पत्नी ईला मिस्त्री यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर ब्रह्मभट्ट नावाच्या शेजाऱ्याच्या घरात घुसून महिला स्नेहल ब्रम्हभट्ट आणि तिची मुलगी जेनीला हिच्यावर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. या दोघींचा आरडा ओरड ऐकून इमारतीत सफाई काम करणारा प्रकाश वाघमारे हा बचावासाठी गेला असता हल्लेखोर चेतन याने त्याच्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले.
याघटनेची माहिती मिळताच दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोर चेतन याला हत्यारासह ताब्यात घेतले आणि इतर रहिवाश्यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी नायर आणि एच.एन रिलायन्स रुग्णालय या ठिकाणी आणले. दरम्यान जखमींपैकी जयेंद्र मिस्त्री, पत्नी ईला मिस्त्री आणि जेनील यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून इतर दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी डीबी. मार्ग पोलिसांनी चेतन रतनशी गाला याच्याविरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीची पत्नी मुलासह सोडून गेल्यामुळे तो मानसिक तणावात होता त्यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
(हेही वाचा – सोनू निगमच्या घरी ७२ लाखांची चोरी करणाऱ्या ड्रायव्हरला अटक)
Join Our WhatsApp Community