फिल्मी स्टाईलने अपहरणकर्त्याचा पाठलाग, ३ महिलांसह ५ जणांना अटक

ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली पूर्वे येथील एका कारखानदार मालकाच्या १२ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या अपहरणकर्त्यांचा पोलिसांनी फिल्मीस्टाईलने पाठलाग केला. गुजरात मधील सुरत येथून पोलिसांनी ३ महिलांसह ५ अपहरणकर्त्यांचा मुसक्या आवळून अपहरण करण्यात आलेल्या मुलाची सुखरूप सुटका केली आहे.

अपहरणकर्त्याचा फोन आला आणि…

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पूर्व मिलाप नगर या ठिकाणी राहणारे कारखानदार रणजित सोमेन्द्र झा यांचा १२ वर्षांचा मुलगा रुद्रा हा ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ट्युशनला जातो म्हणून घरातून सकाळी ८ वाजता बाहेर पडला. १० वाजता घरी येणे अपेक्षित असताना रुद्रा हा घरी आला नव्हता काही वेळाने रणजित झा यांच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. “आपका लडका हमारे पास है, बच्चा चाहते हो, तो एक करोड रूपये का इंतजाम करो वरना बच्चे को जान से मार देंगे.”, अशी धमकी देत अपहरणकर्त्यांनी मुलाला फोन देऊन त्याचा आवाज ऐकवला.

(हेही वाचाः ‘अरे ही तर कर्माची फळं’, पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतीय खेळाडूने शोएब अख्तरची जिरवली)

पोलिसांनी केला तपास सुरू

मुलाचे अपहरण झाल्याचे कळताच घाबरलेल्या वडिलांना काय करावे सुचत नव्हते, त्यांनी लागलीच मानपाडा पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अपहरणकर्त्याचा शोध घेण्यासाठी अप्पर पोलस आयुक्त दत्तात्रय शिंदे ,पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी २० तपास पथके तयार केली.

5 दिवसांच्या प्रयत्नांनंतर गुन्ह्याची उकल

या अपहरणाची उकल करून अपहरण करण्यात आलेल्या मुलाची सुखरूप सुटका करण्यासाठी जवळपास सव्वाशे पोलिसांची फोर्स कामाला लागली होती. ५ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना हा गुन्हा उघडकीस आणण्यास यश आले आहे. ठाणे, पालघर,नाशिक हे तीन जिल्हे आणि गुजरात राज्यातील सुरत अशा चार ठिकाणी अपहरणकर्त्याचा माग काढत जंगल,दरी-खोरे पोलिस पथकांनी अक्षरशः पिंजून काढत या गुन्ह्याची उकल केली.

(हेही वाचाः पंतप्रधानांनी 13 दिवसांपूर्वीच उद्घाटन केलेल्या रेल्वे ट्रॅकवर स्फोट, परिसरात खळबळ)

पाच जणांच्या मुसक्या आवळल्या

अखेरीस गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी एका घरात तपास पथकाने छापा टाकून रुद्राची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका करून, तीन महिलांसह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. फरहदशाह फिरोज शहा रफाई (२६), प्रिन्सकुमार रामनगीना सिंह (२४), शाहीन शाबम मेहतर (२७), फरहीन प्रिन्सकुमार सिंह(२०) आणि राजिया फरहद रफाई (२५)असे अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्यांची नावे आहेत.

झटपट पैसा कमावण्यासाठी योजना

फरहदशाह हा मुख्य आरोपी असून त्याच्यावर गुजरात राज्यात दोन हत्या, घरफोडी सारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. प्रिन्सकुमार हा फरहदशाह याचा मेहुणा आणि फरहीन ही बहीण आहे. राजिया ही फरहदशाहची पत्नी तर शाहीन ही त्याची प्रेयसी आहे. हे सर्व आरोपी मूळचे गुजरात राज्यातील भावनगर येथे राहणारे असून, सध्या ते पालघर जिल्ह्यात स्थायिक झाले होते. आठ महिन्यांपूर्वी हे पाचही जण डोंबिवली पूर्व येथे भाडेतत्वावर खोली घेऊन झटपट पैसा मिळवण्यासाठी गंभीर गुन्ह्यांची योजना आखत होते.

(हेही वाचाः अफझलखान कबर; प्रतापगडाला जेव्हा जाग येते…)

असा रचला कट

दोन महिन्यांपूर्वी त्यांनी अपहरणाचा कट शिजवला होता व कारखानदार रणजित झा यांच्या बंगल्यावर पाळत ठेवली होती. रुद्रा हा त्यांचा एकुलता एक मुलगा असून तो एकटा बाहेर पडत असल्याचे त्यांनी हेरले होते व रुद्राचे अपहरण करून एक कोटी रुपयांची मागणी करायची योजना पाचही आरोपींनी आखली होती, अशी माहिती पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here