वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश घोटाळा, कनेक्शन पश्चिम बंगालपर्यंत

228

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीचे कनेक्शन थेट पश्चिम बंगालपर्यंत असून या गुन्ह्याच्या तपासासाठी गठीत केलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुरुवारी या प्रकरणात पश्चिम बंगाल येथून ४ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीची संख्या ७ वर गेली असून आणखी मोठी टोळी यामध्ये कार्यरत असल्याची शक्यता विशेष पथकाकडून वर्तवली जात आहे.

मुंबईतील टॉप मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एमबीबीएसच्या उमेदवारांची फसवणूक केल्याप्रकरणी एका ३५ वर्षीय रिअल इस्टेट एजंट गणेश रावखंडेला मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी अटक केली होती. त्याने ‘निट’ ची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या चार एमबीबीएस उमेदवारांची एकूण १.१७ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे तसेच या गुन्ह्यात मोठे रॅकेट काम करीत असल्याची माहिती तपासात समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांचे विशेष आयुक्त देवेन भारती या प्रकरणाचा तपास करण्यासाठी संबंधित गुन्हे शाखेची एसआयटी (विशेष पथक) स्थापन करण्यात आले आणि सुमारे ७ प्रकरणे एसआयटीकडे तपासासाठी वर्ग करण्यात आली. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, जेजे, एमआरए मार्ग आणि सायन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एसआयटीने केली पहिली अटक

चेंबूर येथील रिअल इस्टेट एजंट गणेश रावखंडे असे आरोपीचे नाव आहे. रावखंडेला जेजे किंवा ग्रँट मेडिकल कॉलेज प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्याने १.१७ कोटी रुपयांची चार एमबीबीएस ला प्रवेश घेऊ इच्छुक उमेदवारांची फसवणूक केली होती. “नीट निकालानंतर तो सर्व उमेदवारांचा डेटा गोळा करायचा आणि व्यवस्थापन कोट्यात प्रवेश देण्याच्या बहाण्याने पालकांशी संपर्क साधायचा. तो एका व्यक्तीकडून ४० लाख ते ५० लाख रुपये मागायचा. एका गुन्ह्यात फसवणूक झालेले ४ जण समोर आले आहे. इतर सहा गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेले शेकडो जण असण्याची शक्यता आहे असे मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

बंगाल कनेक्शन 

या गुन्ह्याचे धागेदोरे थेट पश्चिम बंगालपर्यंत पोहचले असून गुरुवारी एसआयटीने पश्चिम बंगाल राज्यातून ४ जणांना अटक केली आहे.
आमिर मस्कुर आलम खान (२९), मोहम्मद अली इरशाद आलम मलिक उर्फ पुथ्वी (२८), आनंदराज सुनिलराज उर्फ कुणाल (२८), अभिजीतकुमार प्रमोद झा उर्फ विशाल चौधरी (२९) असे पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती खूप मोठी असून देशभर हे जाळे पसरले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

२०२१ मध्ये एक रॅकेट उध्वस्त 

२०२१ मध्ये एमबीबीएस ऍडमिशन घोटाळा रॅकेट समोर आले होते. या रॅकेटमध्ये सायन हॉस्पिटलच्या डेप्युटी डीनला अटक करण्यात आली होती. जानेवारीमध्ये अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना फसवणाऱ्या सहा जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या टोळीचे मुंबई गुन्हे शाखेकडे असलेल्या गुन्ह्याशी संबंध असल्याचे मुंबई गुन्हे शाखेने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.