पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणी नुकतीच एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती.ही तरुणी बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता होती. अशातच आठ दिवसानंतर तिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा हा मृतदेह आढळून आला आहे. दर्शना दत्तू पवार असं मृत तरुणीचं नाव असून मागील आठ दिवसांपासून दर्शना बेपत्ता होती. नुकतीच ती वन खात्याची आरएफओ ही परीक्षा पास झाली होती. प्रथमिक तपासादरम्यान दर्शनाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वेल्हा आणि सिंहगडरोडच्या नऱ्हे पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी (१८ जून) सकाळच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळलाी होती. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. या सर्व प्रकारावरून मोठ्या घातपाताची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. तरुणीच्या कुटुंबियांनी १५ जूनला सिंहगड रोडच्या नऱ्हे पोलीस स्टेशन मध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती.
(हेही वाचा – नागपूर : तीन चिमुकल्यांचा ‘या’ कारणामुळे झाला खेळता-खेळता मृत्यू)
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील स्पॉट लाईट अॅकॅडमी येथे ९ जून रोजी दर्शना ही सत्कार घेण्यासाठी आली होती. त्यानंतर ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत ती आमच्या संपर्कात होती. १२ जूनला दिवसभर आम्ही दर्शनाला फोन करत होतो. मात्र, तिने फोन उचलले नाहीत म्हणून आम्ही स्पॉट लाईट अॅकॅडमी येथे येऊन चौकशी केली. तेव्हा आम्हाला समजले की, दर्शना ही त्याचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे याच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली आहे. मात्र हे दोघेही संपर्कात नाहीत आणि माघारी देखील आलेले नाहीत. म्हणून आम्ही सिंहगड रोड पोलिसात मिसिंगची तक्रार दिली.
वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात दर्शनाचा मृतदेह सापडला आहे. साधारण आठ दिवसांपूर्वी तिची हत्या झाली असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. दर्शना पवारच्या मृतदेहा जवळ काही वस्तू सापडल्या असून त्यावरून तरुणीची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबधित तरुणी ही पुण्यात एमपीएससी करत होती. ती परीक्षा ती पासही झाली होती. मात्र, आठ दिवसानंतर अचानक मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वेल्हे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community