मुलुंडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोगस डॉक्टरांनी चक्क ४२ जणांना मृत्यूचे दाखले दिले आहेत. या प्रकारची पोलिसांकडून सध्या चौकशी होत असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांमध्ये दोन डॉक्टर असून एक महिला समन्वयक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या तिघांना मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या एम.टी.अग्रवाल बोगस डॉक्टर पुरवठा प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
या दोन डॉक्टरांपैकी एकाने चायना मध्ये एमबीबीएस ची अर्धवट डिग्री घेतलेली असून दुसरा बीएचएमएस डॉक्टर आहे. या दोघांनी मिळून ४२ जणांना मृत्यूचे दाखले दिल्याचे तपासात समोर आले आहे.
(हेही वाचा – उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केली : देवेंद्र फडणवीस)
चंद्रशेखर यादव (३२), सुशांत रामचंद्र जाधव (३०) आणि सूरेखा मयुर चव्हाण (३४) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. चंद्रशेखर हा बोईसर येथे राहणारा असून जाधव हा कल्याण पूर्व येथे राहणारा आहे तर सुरेखा ही खार येथे राहणारी आहे. चंद्रशेखर हा चीनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता, मात्र कोरोनामुळे त्याला आपलं शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागले होते. तर सुशांत जाधव हा बीएचएमएस डॉक्टर असून त्याने एमबीबीएस डॉक्टराचा रजिस्ट्रेशन क्रमांक वापरून एमबीबीएस डॉक्टर म्हणून एम.टी.अग्रवाल रुग्णालयात काम करीत होता. या दोघांच्या काळात रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णांना त्यांनी मृत्युचे दाखले दिले होते. यादव याने ३८ तर जाधव याने ४ जणांचे मृत्यूचे दाखले दिले होते असे तपासात समोर आले.
ट्रस्ट आणि संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
माहितीनुसार, मुलुंड येथील मुंबई महानगर पालिकेचे एम.टी.अग्रवाल सर्वसाधारण रुग्णालयात गेल्या महिन्यात एक धक्कादायक प्रकार घडला. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू ) वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका संस्थने चक्क बोगस डॉक्टरांचा पुरवठा केल्याचे समोर आले होते. या बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर चुकीचे उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप मुलुंड येथील व्यवसायिक गोल्डी शर्मा यांनी केला आहे. शर्मा यांनी चॅरिटेबल ट्रस्टवर कारवाई करण्यात यावी यासाठी न्यायालयात धाव घेतली होती, न्यायालयाने या प्रकणाची दाखल घेत ट्रस्ट आणि संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुलुंड पोलिसांना दिला आहे. मुलुंड पोलिसांनी हत्या, हत्येचा प्रयत्न, कट रचणे, फसवणूक, बोगस कागदपत्रे तयार करणे तसेच वैद्यकीय व्यवसायी अधिनियम कायद्यांतर्गत ट्रस्ट सह संचालकानावर गुन्हा दाखल केला आहे.
जीवनज्योत चॅरिटेबल ट्रस्ट आणि ट्रस्ट चे पदाधिकारी वीरेंद्र यादव, ज्योती ठक्कर, जे.सी. वकील, रतनलाल जैन, दीपक जैन, दीप्ती मेहता यांच्यावर मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community