कोकण किनारपट्टीवर वाहून आलेल्या ‘चरस’ या अमली पदार्थाची मुंबईत विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी या प्रकरणी मुंबईतून एकाला तर उरण येथून एकाला असे दोन जणांना अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दोघांकडून पोलिसांनी जवळपास ७ किलो उच्च दर्जाचा चरस हा अमली पदार्थ जप्त केला आहे. राज्यातील रत्नागिरी, रायगड या जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवर मागील दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात अफगाणी चरस हा वाहून आला होता. रत्नागिरी पोलीस आणि रायगड पोलिसांनी वाहून आलेला जवळपास ६०० किलो पेक्षा जास्त चरस हा अमली पदार्थ जप्त केला होता. जप्त करण्यात आलेल्या चरसच्या गोण्यावर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान असे लिहण्यात आलेले आहे. (Mumbai Drugs)
हा चरस समुद्रातून वाहत कोकण किनारपट्टी तसेच गुजरात किनारपट्टीवर आला होता. या चरसची समुद्रामार्गे बेकायदेशीर वाहतुक सुरू असताना तस्करांकडून समुद्राच्या आत एका बोटीतून दुसऱ्या बोटीत चरसच्या गोण्या वळत्या करीत असताना त्यातील काही चरसच्या गोण्या समुद्रतील लाटांनी वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावर वाहत आल्या असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली गेली होती. दरम्यान, वाहत आलेला काही चरसच्या गोण्या मच्छिमारांच्या जाळ्यात अडकल्यामुळे काही मच्छिमारांनी या गोण्या पोलिसांना न सोपवता स्वतःजवळ ठेवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेला काही दिवस उलटल्यानंतर काही मच्छिमारांकडून हा चरस हळूहळू विक्रीसाठी बाहेर काढला जात आहे. उच्च दर्जाचा अफगाणी चरस असल्यामुळे ड्रग्स माफियांमध्ये या चरसला अधिक मागणी असून या ड्रग्स माफियाच्या शोधात काही जण चरसचे नमुने घेऊन मुंबईत दाखल झाले आहे. (Mumbai Drugs)
(हेही वाचा – Nobel Prize 2023 : कोविड लस निर्मितीत ‘या’ शास्त्रज्ञांचे महत्त्वाचे योगदान, औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर)
ट्रोम्बे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मानखुर्द वाशी चेकनाका येथून मोहम्मद नदीम इद्रिस शाह (३०) या दीड किलो चरससह अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीत तो उरण येथे राहणारा असून शहाला हे पॅकेट कोठून मिळाले याबाबत विचारले असता, त्याने अक्षय वाघमारे (२६) या व्यक्तीने दिल्याचे सांगितले, व वाघामारे याची तो वाट पहात होता असे पोलिसांना सांगितले. दरम्यान पोलिसांनी वाशी चेकनाका येथे सापळा रचून अक्षय वाघमारे याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून जवळपास अडीज किलो चरस जप्त करण्यात आले. चौकशीत त्याला हे चरस उरण येथे समुद्र किनाऱ्यावर मिळून आले होते व एका मित्राच्या सांगण्यावरून ते चरस मुंबईत विक्रीसाठी आणल्याची कबुली त्याने दिली. ट्रॉम्बे पोलिसांनी उरण येथे जाऊन अक्षय वाघमारेच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना तेथून अडीज ते तीन किलो चरस जप्त केला आहे. ऑगस्टमध्ये, नवी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिटने २ किलो चरस विकण्यासाठी आलेल्या तीस वर्षातील एका व्यक्तीला अटक केली होती. या अमली पदार्थांबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता तो पोलिसांना रत्नागिरीत घेऊन गेला आणि तेथे त्याने ८ किलो चरस पोलिसांच्या ताब्यात दिले व हे चरसचे पाकीटे त्याला समुद्रकिनाऱ्यावर सापडल्याचा खुलासा केला. रत्नागिरी पोलिसांनी अशी आणखी पाकिटे शोधण्यासाठी किनारपट्टीवर शोध मोहीम सुरू केली आहे. (Mumbai Drugs)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community