मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड Tahawwur Rana ला विशेष विमानाने भारतात आणणार; तिहार कि आर्थर रोड, सस्पेन्स कायम

64

मुंबईवरील २६/११ हल्ल्याच्या (26/11 mumbai attack) मास्टरमाईंड तहव्वूर राणाला (Tahawwur Rana) घेऊन एनआयए पथक १० एप्रिला या दिवशी दिल्लीत दाखल होत आहे. राणाच्या प्रत्यार्पणाची याचिका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यावर राणाचा ताबा घेण्यासाठी एनआयए आणि वरिष्ठ वकिलांचे विशेष पथक अमेरिकेत दाखल झाले. राणाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

(हेही वाचा – Mumbai Crime News : चेंबूरमध्ये बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार)

दिल्लीत आल्यावर काय होईल ?

तहव्वूर राणाला घेऊन एनआयए (NIA) पथक दिल्लीत दाखल होईल. राणासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन कोठड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. राणाची प्राथमिक चौकशी दिल्लीतल्या एनआयएच्या मुख्यालयातच होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याच्यावर मुंबईत खटला चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Jail) अजमल कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला ठेवण्यात येऊ शकते. तसंच मुंबई पोलीसही त्याची कोठडी घेऊ शकतात. तहव्वूर राणावर भारतात खटला चालवून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्याची संधी भारताला आहे.

सदानंद दातेंवर चौकशीची जबाबदारी

तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी एनआयएची सात सदस्यांची विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे. त्यात काही वरिष्ठ वकीलही आहेत. एडीजी रँकच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे टीमचे नेतृत्व सोपवण्यात आलंय. एनआयएचे प्रमुख सदानंद दातेंवर (Sadanand Date) राणाच्या प्रत्यर्पणासह चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आलीय. विशेष म्हणजे २६/११ च्या हल्ल्यात स्वतः दातेंनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. सदानंद दातेंनी आपल्या छोट्या टीमसह कामा रूग्णालयावर हल्ल्याला तोंड दिले होते. हल्ल्यात स्वतः जखमी झालेल्या दातेंनी त्या वेळी अनेकांचे प्राण वाचवले होते.

कोण आहे तहव्वुर राणा ?

1961 मध्ये पाकिस्तानमध्ये (Pakistan) जन्मलेल्या तहव्वुर राणाने सुरुवातीला पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले आणि नंतर 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात तो कॅनडाला गेला. कॅनेडियन नागरिकत्व मिळाल्यानंतर, तो शिकागो येथे स्थायिक झाला, जिथे तो इमिग्रेशन कन्सल्टन्सीसह विविध व्यवसाय चालवत होता. 2009 मध्ये, राणाला 2008 च्या मुंबई हल्ल्यात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली होती, ज्यामध्ये 160 हून अधिक लोक मारले गेले होते. प्रेषित मुहम्मदचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करणाऱ्या जिलँड्स-पोस्टेनवरील हल्ल्याच्या प्रयत्नाशीही त्याचा संबंध होता. राणावर 12 गुन्ह्यांचा आरोप होता, ज्यामध्ये अमेरिकन नागरिकांच्या हत्येला मदत करणे आणि प्रोत्साहन देणे यांचा समावेश होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.