अँटॉप हिल येथे दोन भावंडांचा बंद असलेल्या एका मोटारीत मृतदेह मिळून आल्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी बेवारस उभ्या असलेल्या मोटारींचा प्रश्न समोर आला आहे. या बेवारस मोटारी हटविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई वाहतूक विभागाची मदत घेणार आहे. प्रथम या बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यात येईल, वारस मिळून न आल्यास या मोटारी भंगारात काढण्याचा निर्णय महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. (Mumbai Crime)
अँटॉप हिलच्या सीजीएस वसाहत या ठिकाणी बेवारस उभ्या असलेल्या एका मोटारीत २४ एप्रिल रोजी मुस्कान बेगम शेख (५) आणि साजिद शेख (७) या दोन भावंडांचे मृतदेह मिळून आले होते. दुपारी घराबाहेर खेळत असताना हे दोन्ही बहिण-भाऊ बेपत्ता झाले होते. रात्री या दोघांचे मृतदेह अँटॉप हिल पोलिसांना बंद अवस्थेत असलेल्या बेवारस असलेल्या मोटारीत मिळून आले. प्राथमिक तपासात या दोघांचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचे समोर आले असले तरी शवविच्छेदन विभागाने मृत्यूचे कारण अद्याप राखून ठेवले आहे. (Mumbai Crime)
(हेही वाचा – Mumbai Crime : हरवलेल्या दोन भांवडाचे मृतदेह एका बंद मोटारीत आढळून आल्याने खळबळ उडाली)
मनपाने घेतला हा निर्णय
या घटनेनंतर रस्त्यावर, रहिवासी विभागात बेवारसपणे उभ्या असलेल्या मोटारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई वाहतूक विभागाने आणि मुंबई महानगरपालिकेने रस्त्याच्या कडेला बेवारस भंगारात उभी असलेली वाहने उचलून त्या भंगारात टाकण्याची मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान मुंबईभर हजारो भंगार झालेल्या बेवारस मोटारी व इतर वाहने उचलून रस्ता मोकळा करण्यात आला होता. मुंबईत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात भंगार झालेली बेवारस वाहने वाढली आहे, या वाहनांमुळे वाहतूक कोंडी, तसेच डासांची उत्पत्ती होऊन रोगराई पसरते, तसेच रहिवाशी विभागात बेवारस उभ्या असलेल्या मोटारीमुळे मोठी दुर्घटना होऊ शकते हे लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने ही बेवारस वाहने हटवून ती भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbai Crime)
“आम्ही या परिसरातून बेवारस सोडलेली वाहने हटवण्यासाठी पोलिस आणि वाहतूक विभागाशी चर्चा करत आहोत. सर्वेक्षण केल्यानंतर आम्ही वाहन मालकांना शोधून काढू आणि जर त्यांनी कारचा दावा केला नाही, तर आम्ही शेवटी त्यांना भंगारात जमा करू,” असे मनपाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही, परंतु सर्व बेवारस वाहने लवकरच हटविले जातील असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मध्य वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) समाधान पवार यांनी सांगितले की, “आम्ही परिसरातील भंगार झालेल्या वाहनांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाहने काढली जातील. वाहनाच्या स्थितीनुसार, त्याचा लिलाव करायचा की भंगारात काढायचे हे आम्ही ठरवू.” (Mumbai Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community