दहावी पास ४ हजार तर बारावी पास ५ हजार रुपये; बनावट प्रमाणपत्र बनवून देणारी टोळी गजाआड

87

परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्यांना दहावी, बारावी पास तसेच खासगी कंपन्यांतील अनुभवाचे बोगस प्रमाणपत्र बनवून देणारे रॅकेट मुंबई गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले आहे. गुन्हे शाखेने याप्रकरणी चेंबूर वाशीनाका परिसरातून चौघांना अटक केली आहे. सलमान सलाउद्दीन खान, मोहम्मद नदीम शेख, मोहम्मद मुर्तझा आणि दानिश खान अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. या टोळीजवळून मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्रे तसेच संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या टोळीने मागील काही वर्षांत शेकडोच्या संख्येने बोगस प्रमाणपत्रे तयार करून त्यांची ४ ते ५ हजार रुपयांमध्ये विक्री केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या टोळीविरुद्ध गुन्हे शाखेने आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. परदेशात नोकरी करण्यासाठी शेकडो जणांनी या टोळीकडून बोगस प्रमाणपत्रे विकत घेऊन परदेशातील नोकरी करीत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

चेंबूर वाशीनाका या ठिकाणी एका झेरॉक्स सेंटरमध्ये दहावी, बारावी तसेच विविध खासगी कंपन्यांचे बनावट प्रमाणपत्रे तयार करून त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्ष यांना मिळाली होती, या माहितीच्या आधारे गुप्तवार्ता कक्षाने मंगळवारी वाशीनाका येथील झेरॉक्स सेंटरवर छापेमारी करून चौघांना बोगस प्रमाणपत्रासह अटक करण्यात आली. या टोळीने मागील काही वर्षांपासून बोगस प्रमाणपत्र बनवून देण्याचा बेकायदेशीर धंदा सुरू केला होता. ही टोळी शेकडो जणांकडून प्रत्येकी ४ ते ५ हजार रुपये घेऊन बोगस प्रमाणपत्रे देत होती. अनेक जणांनी या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे परदेशात नोकरी मिळवली असल्याची माहिती समोर येत आहे. संगणकावरील फोटोशॉपचा वापर करून प्रमाणपत्रावरील मूळ व्यक्तीचे नाव बदलल्याचे आढळून आले.

“तपासादरम्यान, आम्हाला असे समजले की, अनेक लोक ज्यांनी एसएससी आणि एचएससी परीक्षा उत्तीर्ण केल्या नाहीत, ते परदेशात गेले आहेत, विशेषत: आखाती देशांमध्ये जेथे त्यांना मूलभूत शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रमाणपत्रे देखील आवश्यक आहेत असे अनेकजण या टोळीकडे जाऊन बोगस प्रमाणपत्रे मिळवीत होती” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी बनावट प्रमाणपत्रे, एक संगणक, एक प्रिंटर, पाच मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

(हेही वाचा – लाचखोर पोलीस निरीक्षकाला फिल्मी स्टाईलने पकडले; लाखोंची रोकड आणि दागिने जप्त)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.